पद्मावती वाद : शशी थरुर यांना कॉंग्रेस नेत्याचाच 'घरचा आहेर'

 थरुर यांचे म्हणणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी इतिहास वाचावा असा सल्ला सिंधिया यांनी दिला. 

Updated: Nov 17, 2017, 09:16 PM IST
 पद्मावती वाद : शशी थरुर यांना कॉंग्रेस नेत्याचाच 'घरचा आहेर' title=

नवी दिल्ली : संजय लीला भंसालीच्या पद्मावती सिनेमावरून सुरू असलेल्या वादात दोन कॉंग्रेसच्या बड्या नेते समोरासमोर आले आहेत. महारांजांबद्दल शशी थरुर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद वाढत चालला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी थरुर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

थरुरांना सल्ला 

कॉंग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ज्यातिरादित्य स्वत: सिंधिया राज घराण्यातील असून त्यांनी थरुर यांचे म्हणणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी इतिहास वाचावा असा सल्लाही दिला आहे. 

मला अभिमान 

घाबरट महाराजा अशा शशी थरुर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल सिंधिया यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. मला वाटते थरुर यांनी इतिहास वाचायला हवा. मी ज्योतिरादित्य सिंधिया आहे आणि मला याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी एएनआयला दिली.

तेव्हा महाराजा पळून गेले

आजच्या 'तथाकथित पराक्रमी महाराजा' एका सिनेनिर्मात्याच्या मागे पडले आहेत. आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे असा दावा करत आहेत. हेच महाराजा त्यावेळी पळून गेले होते जेव्हा ब्रिटीशांनी त्यांच्या मानसन्मानाच्या चिंधड्या केल्या होत्या असे थरुर यांनी म्हटले होते. 

मी 'त्या' राजांबद्दल बोललो 

दरम्यान थरुर यांनी यावर प्रतिक्रीया देत सफाई देण्यात आली आहे. मी राजपूत समाजाविरुद्ध भूमिका घेतल्याचा प्रचार काही भाजपाच्या अंधभक्तांमार्फत केला जात आहे. जे स्वातंत्र्य चळवळीतही इंग्रजांच्यासोबत होते त्या राजांबद्दल मी बोलत होतो असे स्पष्टीकरण थरुर यांनी दिले. 

भावनांचा आदर 

भारताची विविधता आणि समरसता पाहता राजपूत समाजाच्या भावनेचा आदर करणे सर्वांचे कर्तव्य आहे. राजपूतांची कर्तबगारी हा आपला इतिहास आहे, यावर प्रश्न उभा राहू शकत नाही. भाजपा आणि सेन्सॉर बोर्डला या भावनांचा आदर करायला हवा असेही थरुर यांनी सांगितले.

१२ जानेवारीला सिनेमाघरात

 'पद्मावती' हा सिनेमा १ डिसेंबर पासून सिनेमाघरांत दिसणार होता.  पण वादात अडकल्याने हा  "पद्मावती" पुढील वर्षी १२ जानेवारीला रिलीज होण्याची दाट शक्यता आहे. सेंसॉर बोर्डाने अद्याप 'पद्मावती' सिनेमा पाहिला नसल्याने ही तारीख पुढे गेल्याचे म्हटले जात आहे.