पाहा कोण आहेत 'या' 40 निर्भीड अनुसूचित महिला, ज्यांची मजल ऑस्करपर्यंत...

ज्या क्षणी ही बातमी समोर आली, त्या क्षणापासून हा माहितीपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे, याबाबत कुतूहल पाहायला मिळालं.   

Updated: Feb 9, 2022, 03:48 PM IST
पाहा कोण आहेत 'या' 40 निर्भीड अनुसूचित महिला, ज्यांची मजल ऑस्करपर्यंत... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चित्रपट, माहितीपट आणि लघुपट क्षेत्रामध्ये कोणत्याही कलाकृतीनं ऑस्करपर्यंत मजल मारणं म्हणजे त्या कलाकृतीचा आणि त्यातील कलाकारांचा मान असतो. अतिशय मानाच्या अशा या ऑस्करमध्ये (Oscars 2022) यंदा भारताच्या ‘रायटिंग विथ फायर’ (Writing With Fire) या माहितीपटाला अंतिम नामांकनामध्ये जागा मिळाली आहे. 

सुमित घोष आणि रिंतू थॉमस यांनी या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्यानं थेट ऑस्करपर्यंत मजल मारली. 

ज्या क्षणी ही बातमी समोर आली, त्या क्षणापासून हा माहितीपट नेमका कोणत्या विषयावर आधारित आहे, याबाबत कुतूहल पाहायला मिळालं. 

जिथे सध्याच्या काळात पत्रकार आणि पत्रकारितेला अर्ध्याहून जास्त जग हे विविध कारणांसाठी दोषी ठरवत असतं, तिथेच हा माहीतीपट पत्रकारिता आणि पत्रकारांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहे. 

'खबर लहरिया' (Khabar Lahariya ) या वर्तमानपत्राचा जन्म कसा झाला आणि त्यातून महिला, बालकांना प्रेरणास्थानी ठेवत कशा पद्धतीनं समाजात एक नवा पायंडा घातला गेला याचं चित्रण या माहितीपटामध्ये करण्यात आलं आहे. 

केव्हा झाली सुरुवात ? 
2002 पासून हे वर्तमानपत्र चित्रकूटसह बुंदेलखंडमधील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं. हिंदी किंवा इंग्रजी नव्हे, तर सर्वसामान्यांना कळेल अशा बुदेली आणि अवधी या स्थानिक भाषांमध्ये यातून बातम्या दिल्या गेल्या. 

ज्यांना स्थानिक वगळता इतर कोणत्याही भाषा येत नाहीत. त्यांच्यासाठी होता, हा 'खबर लहरिया'. फक्त देश नाही,  तर आता जागतिक स्तरावर ही खबर... गाजतेय. 

जवळपास 20 वर्षांपूर्वी सुरु झालेलं हे वर्तमानपत्र आता भोजपूरी भाषेतही प्रसिद्ध होत आहे. खेडेगावातील 40 सर्वसामान्य महिलांनी या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केलं. 

वर्तमानपत्रासाठीचं प्रत्येक लहानमोठं काम केलं. बातमी मिळवण्यापासून ते अगदी वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्यापर्यंतच्या कामाचा यात समावेश होता. 

उल्लेखनीय बाब अशी, की ज्या घटकांना आजही काही ठिकाणी हीन वागणूक दिली जाते अशा समाजातील महिलांनी पुढाकार येत सर्वांपुढे आदर्श प्रस्थापित केला. 

देशातील हे पहिलं वर्तमानपत्र आहे, जे अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी सुरु केलं. 'निरंतर' या स्वयंसेवी संस्थेनं मीरा जाटव, शालिनी जोशी आणि कविका बुंदेलखंडी यांच्यासोबत एकत्र येत केली. 

अवघ्या 12 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं कवितानं शिक्षण पूर्ण केलं आणि संपूर्ण टीमच्या मदतीनं 'खबर लहरिया' सुरु केलं. 

या वर्तमानपत्रामध्ये सर्व महिला काम करतात. इथे कोणी आदिवासी आहे तर कोणी अल्पसंख्यांक समाजातील. इथे काम करणाऱ्या अनेकजणींकडे पत्रकारितेची पदवी नाही. पण, या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारं काळीज मात्र त्यांच्याकडे आहे. 

समाजातील काही असे मुद्दे ज्यांच्याबाबत सहसा खुलेपणानं चर्चा होत नाही अशा मुद्द्यांर या वर्तमानपत्रातून प्रकाश टाकला जातो. 2015 मध्ये या वर्तमानपत्राचं काम बंद झालं. पण, आधुक काळानुरुप याचं संकेतस्थळ सुरु करण्यात आलं. 

आताच्या घडीला संपूर्णपणे डिजीटल स्वरुपात या माध्यमातून बातम्या दिल्या जातात. स्थानिक भाषांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता इंग्रजीपर्यंत पोहोचला आहे. 

आपल्या देशात एक काळ असा होता, जेव्हा निर्भीड पत्रकारितेला प्रचंड आदर होता. समाजात पत्रकारांकडे मानानं पाहिलं जात होतं.

हल्ली मात्र सर्वसामान्यांमध्ये या संकल्पना बदललेल्या आहेत. मुळात पत्रकारितेचं स्परुपच बदललं आहे. निर्भीडतेची जागा आता व्यावयसायिकरणाने घेतलेली स्पष्टपणे दिसत आहे. 

अशा परिस्थितीमध्येही 'खबर लहरिया' मात्र त्याची ओळख आजही टिकवून आहे ही बाब खरंच कौतुकास्पद.