मुंबई : 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' असं म्हणत प्रविण तरडे एका योद्ध्याच्या रुपात सर्वांसमोर आले आहेत. निमित्त आहे ते म्हणजे आगाम चित्रपट 'सरसेनापती हंबीरराव'चं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यांना पुढे जाऊन अशा काही खास माणसांची ज्यांच्या साथीनं खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र आणखी कणखर झाला.
राकट देशा, कणखर देशा... म्हणून नावाजल्या गेलेल्या अशाच एका वीराच्या कर्तृत्त्वावर 'सरसेनापती हंबीरराव' मधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
लेखन, दिग्दर्शन, कथा , पटकथा अशी चतुरस्त्र खेळी प्रविण तरडे यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं केली आहे.
मध्यवर्ती भूमिका सारात ज्यावेळी त्यांच्या दमदार आवाजात 'दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला, तर थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली...' असे संवाद कानांवर पडतात तेव्हा अंगावर काटा उभा राहतो.
शत्रूशी लढताना सर्वस्व पणाला लावणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत ताठ मानेनं जगणाऱ्या मराठा मावळ्याचं चित्रण चित्रपटाच्या निमित्तानं करण्यात आलं आहे.
अवघ्या काही मिनिटांच्या या टीझर व्हिडीओमध्ये असणारे डायलॉग मनाला भिडतात, त्याचप्रमाणे दृश्य एकाच जागी खिळवून ठेवतात.
टिझरच्या शेवटी अखेर, या प्रश्नाचं उत्तर मिळतंच की प्रविण तरडे का म्हणतात, 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट'.