नितीन देसाईंच्या निधनाने अक्षय कुमार हळहळला; OMG-2च्या ट्रेलरबाबत घेतला मोठा निर्णय

OMG-2 Trailer Launch: नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. अभिनेता अक्षय कुमारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 2, 2023, 06:52 PM IST
नितीन देसाईंच्या निधनाने अक्षय कुमार हळहळला; OMG-2च्या ट्रेलरबाबत घेतला मोठा निर्णय title=
Nitin Desai Suicide Akshay Kumar postpones OMG 2 trailer release respect Nitin Desai bollywood art director news in marathi

OMG-2 Trailer Launch: हिंदी आणि मराठी मनोरंजनश्रृष्टीतील लोकप्रिय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 जुलै रोजी गळफास घेत आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभरात शोककळा पसरली आहे. देसाई यांच्या निधनाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही हळहळला आहे. अक्षयने त्याचा आगामी चित्रपट  OMG 2 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

नितीन देसाई यांनी बुधवारी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठीबरोबरच बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शनाचे काम केले आहे. देसाई यांच्या निधनानंतर राजकारण्यांसह कलाकारांनीही त्यांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता अक्षय कुमार यांनीही श्रद्धांजली वाहत एक मोठा निर्णयही जाहीर केला आहे. 

अक्षय कुमार यांनी ट्वीट करत नितीन देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. विश्वासच बसत नाहीये, नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ते प्रोडक्शन डिझाइनबरोबरच आमच्या सिनेमाविश्वातील मोठं नाव होतं. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांसाठी काम केले. नितीन देसाई यांच्या निधनाने कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे, असं अक्षय कुमार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, त्यांच्या सन्मानार्थ आम्ही आज रिलीज होणारा OMG-2चा ट्रेलर पुढे ढकलत आहोत. उद्या सकाळी 11 वाजता OMG-2चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे, असं अक्षय कुमारने म्हटलं आहे. 

अक्षय कुमारने दिलेल्या माहितीनुसार, OMG-2चा ट्रेलर 3 ऑगस्ट रोजी 11 वाजता रिलीज करण्यात येणार आहे. अक्षय कुमारच्या या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्याम,  अक्षय कुमारचा ओमायजी 2 चित्रपट 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबतच पंकज त्रिपाठी, यामी गौतमी मुख्य भूमिकेत आहेत. 

नितीन देसाईंवर कोटींचे कर्ज

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हॉइस क्लिप रेकॉर्ड करुन ठेवल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. काल रात्री उशिर ते मुंबईत आले होते. त्यानंतर ते थेट कर्जत येथील एनडी स्टुडीओत गेले होते. तिथे त्यांनी काही व्हॉइस नोट रेकॉर्ड करुन ठेवल्या होत्या. या व्हॉइस क्लिपमध्ये त्यांनी काही बिझनेसमनची नावं असल्याचे म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्यावर 250 कोटींचे कर्ज होते.