नवी दिल्ली : नेटफ्लिक्सची वेब सीरीज बॉम्बे बेगम्सच्या वादात सापडली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या या मालिकेत अयोग्य पद्धतीने मुलांना चित्रित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे या वेब सीरीजचं प्रसारण थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) यांनी याबाबत तक्रार केली आहे.
बाल हक्कांच्या संरक्षणासाठी एनसीपीसीआर ही सर्वोच्च संस्था आहे. वेब सीरीजचं प्रसारण थांबविण्यासाठी एनसीपीसीआरने नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली आहे. एनसीपीसीआरने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला 24 तासात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आयोगाने म्हटलं आहे की, त्यांनी उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.
तक्रारीच्या आधारे कमिशनने नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली आहे. तक्रारीत असा आरोप केला गेला आहे की, या वेब सीरीजमध्ये अल्पवयीन मुलांवर अनैतिक लैंगिक संबंध आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याचे दाखवण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या वेब सीरीजवर आक्षेप घेत म्हटले की, अशा प्रकारच्या कंटेंटमुळे केवळ तरुणांच्या मनावरच परिणाम होणार नाही तर यामुळे मुलांचे शोषण देखील होऊ शकते.
कमिशनने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, "नेटफ्लिक्सने मुलांच्या बाबतीत किंवा मुलांसाठी कोणताही कंटेंट प्रसारित करतांना अधिक काळजी घ्यावी. ही वेब सीरीज त्वरीत थांबवण्यास सांगितले आहे. 24 तासांच्या आत एक सविस्तर अहवाल सादर करावा "तसे न झाल्यास सीपीसीआर अधिनियम 2005 च्या कलमाखाली आयोग योग्य ती कारवाई करण्यास बाध्य होईल."
बॉम्बे बेगम्स ही 5 महिलांवर आधारीत कथा आहे. या वेब सीरीजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. या मालिकेत पूजा भट्टसह अमृता सुभाष, शहाना गोस्वामी, आध्या आनंद आणि प्लाबिता बोरठाकुर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.