मुंबई : वाढत्या वाहनांमुळे सर्वत्र फक्त वाहतूक कोंडी परिणामी होणारं प्रदुषण. प्रगतीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या माणसाला निसर्गाचा मात्र विसर पडला आहे. रस्त्यांवर फक्त आणि फक्त ट्राफिक ही कसली प्रगती? असा प्रश्न तेजस्विनीने लोकांना विचारला आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.
पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या दिवशी महालक्ष्मी, पाचव्या दिवशी शेरावाली माता, साहव्या दिवशी तुळजाभवानी अशा रुपांमध्ये दिसणाऱ्या तेजस्विनीने सातव्या दिवशी 'मुंबादेवी'चं रूप धारण केलं आहे.
'देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकीक ....देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले.....प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धडकत राहणारी मी !!! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं........पण त्यावरील अगणित खड्डे? ..ते मात्र जीवघेणे ठरतायेत....
सगळीकडे फक्त ट्राफिक आणि ट्राफिक....ही कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात ....मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज ....अहोरात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श होर्न आणि गोंगाट...हि माझी नगरी .....मी मुंबा आणि हि माझी मुंबा पुरी ..मुंबई!!!' अशा प्रकारचे वास्तवदर्शी फोटो शेअर करत ती समाजामध्ये जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.