मुंबई : महाराष्ट्राच्या संगीताचा, लोकपरंपरेचा आणि प्रबोधनपर मनोरंजनाचा वारसा सांगायचा झाला तर तो संत रचनांपासून सुरू होतो आणि किर्तनकारांच्या प्रवचनांनी बहरतो. संतांनी भक्तीला लोकजागराचा स्त्रोत बनवलं आणि संतवाणीतून व्यक्त झालेल्या विचांराना समाज प्रबोधनाचं माध्यम बनवलं. अशा या महाराष्ट्रातील संतसाहित्याचा, संतरचनांचा प्रवाह आजच्या पिढीपर्यंत खळाळता ठेवणाऱ्या किर्तनकारांचा सन्मान झी टॉकीज वाहिनीच्यावतीने करण्यात आला. आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी लोकसंगीत, लोकगीतं यांची केलेली शब्दरचना आणि नंदेश यांचा पहाडी आवाज यांचा मिलाफ घडवत उत्सव किर्तनाचा… गौरव किर्तनकारांचा हा सोहळा रंगला.
१८ ऑक्टोबरच्या सायंकाळी झी टॉकीज वाहिनीतर्फे किर्तनकारांचा गौरव करण्यात आला. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील किर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी मराठी सिनेमा क्षेत्रातील सुबोध भावे , भाऊ कदम , हार्दिक जोशी ,सायली संजीव , सुयश टिळक तसेच इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रक्षेपित केला जाणार आहे ज्याचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.
उत्सव किर्तनाचा… गौरव किर्तनकारांचा हा सोहळा गाजला तो प्रख्यात गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजाने. लोकसंगीताचे बाळकडू ज्यांना वडील शाहीर विठ्ठल उमप यांच्याकडून मिळाले त्या नंदेश यांनी किर्तनकारांच्या सन्मानाचा मंच आपल्या खड्या आवाजाने भारावून टाकला. लोकगीत, लोकसंगीतासाठी नंदेश यांचा स्वर पक्का करणाऱ्या शाहीर विठ्ठल उमप यांच्याकडून मिळालेला हा वारसा नंदेश यांनी किती आत्मीयतेने जपला आहे याचा साक्षीदार या सोहळ्यातील सन्माननीय किर्तनकारांपासून मान्यवर अतिथींपर्यंत प्रत्येकजण झाला. आता २७ नोव्हेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता
नंदेश उमप यांच्या गायकीची प्रचिती घेण्याची पर्वणी लाखो प्रेक्षकांना घरी बसून घेता येणार आहे.
यानिमित्ताने नंदेश उमप यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, किर्तनकारांच्या सन्मानार्थ लोकगीत गायनाचा आनंद ओसंडून वाहत होता. नंदेश उमप म्हणाले, “संतसाहित्य, किर्तन, प्रवचन ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मान आहे. वाङमय किर्तनाला फार मोलाचे स्थान आहे. मनोरंजनातूनही प्रबोधन करता येतं हे संतांनी सांगितलं. संतसाहित्याने मराठी संस्कृतीला दिलेलं अधिष्ठान हा आपला ठेवा आहे.
अशा या संतपरंपरेतील किर्तनाचा जागर करण्याचं पाऊल झी टॉकीजने उचललं आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.या सोहळ्यात मी संत एकनाथांच्या 'विंचू चावला' या भारूडाच्या धर्तीवर एक गाणं सादर करणार आहे. हे भारूड आजच्या काळातील अनेक चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारं असेल, पण त्याचबरोबर विचारांची मशागत करणारंही असेल. याशिवाय 'अरे ज्ञाना ज्ञाना' , 'चल गं सखे पंढरीला' , 'पंढरपुरात वाजतो' , 'देवाचं लेणं' अशी गाणी गाण्याची संधी या मंचावर मला मिळणार हे भाग्यच आहे. आजच्या क्षणभंगूर गाण्यांच्या वादळात संतसाहित्याने प्रज्वलित केलेली ही कीर्तनाची पणती तेवत ठेवण्यात एक वेगळच समाधान आहे'' असंही नंदेश उमप म्हणाले.