मुंबई : जेएनयूमधील हिंसाचाराने पुन्हा एकदा वाद पेटला आहे. जेएनयूमध्ये अज्ञातांनी हल्ला करून विद्यापीठाचे नुकसान केले एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. यामध्ये विद्यार्थी नेता आइशी घोष जबर जखमी झाली. जेएनयूमधल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले आहेत.
मुंबई-पुण्यातही या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं रात्रीच्या सुमारास कँडलमार्च काढण्यात आला. या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावर ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना म्हणतात,'विद्यार्थी म्हणून आम्हीही होतो आणि तुम्हीही आहात. मुळामध्ये आपले आई-वडिल कोणत्या परिस्थितीतून जात असताना आपल्याला शिकवतात हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. कारण आम्हाला आता जर का कोणत्या राजकीय पक्षाने लोटलं तर आमचं विद्यार्थी म्हणून करिअर जातं. हे विद्यार्थ्यांना कळतं नाही. हे राजकीय पक्ष सोडायला येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं', अशी प्रतिक्रिया दिली आहे. (JNU हिंसाचारावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया)
विद्यार्थ्यांचे या आंदोलनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही देशभरात पसरत आहे. यावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर या घटनेनंतर खूप त्रस्त दिसली. एक व्हिडिओ शेअर करून तिने आपली भावना व्यक्त केली. या व्हिडिओत स्वरा भास्कर आपल्या भावना रोखू शकली नाही. स्वराने या हल्याचा आरोप एबीवीपीवर केला आहे. स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,'अर्जंट अपील. सगळे दिल्लीकर, बाबा गंगनाथ मार्गावर असलेल्या जेएनयू परिसराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहा. जेणे करून सरकार आणि दिल्ली पोलीसांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढवला जाऊ शकतो. आणि एबीवीपीच्या मास्क घातलेल्या गुंडांनी केलेल्या तोडफोडीला रोखू शकतो.'