Namarata Sambherao and Boman Irani : अनेक मराठमोळे कलाकार आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात काही कलाकार आहेत ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी कार्यक्रमाती कलाकारही मागे नाहीत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील 'लॉली' म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांचाही तिच्या चाहत्यांच्या यादीत समावेश आहे. पण तुम्हाला माहितीये अभिनेता बोमन इराणी देखील नम्रता संभेरावचे चाहते आहेत. 'एकदा येऊन तर बघा' या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं नम्रतानं 'झी24 तास'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
या मुलाखतीत नम्रतानं बोमन इराणी यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव आणि तिचा अभिनय पाहून त्यांनी काय केलं किंवा काय म्हणाले याविषयी सांगितलं आहे. " 'व्हेन्टिलेटर' या चित्रपटात बोमन इराणी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात मी आगरी लहेजा वापरला होता. त्यांना तो लहेजा इतका आवडला की त्यांनी आमचे दिग्दर्शक राजेश मापुसकरांना विचारलं, ही कोण आहे? काय करते? त्यावेळी त्यांनी सांगितलं की ती एक शो करते. तिथे तिची एक भूमिका असून त्यात ही भाषा वापरली आहे. तेव्हा ते म्हणाले की मी कधी ना कधी हे माझ्या कोणत्या ना कोणत्या चित्रपटात वापरणार आहे. हे मला फार आवडलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं सर तुम्ही नक्कीच शो पाहा," असं नम्रता म्हणाली.
हेही वाचा : कॉमेडी किंग जॉनी लिव्हर लॉलीचा मोठा फॅन... नम्रताला दिले 'हे' महागडे गिफ्ट
बोमन इराणी यांच्या कारमध्ये बसण्याचा किस्सा सांगत नम्रता म्हणाली, "पॅकअप झाल्यानंतर मी बाहेर पडले. मला काळाचौकीला माहेरी जायचं होतं, मी रिक्षाची वाट बघत होते. तेव्हा अचानक त्यांनी मागूण हाक मारली. नम्रता कुठे जातेस? मी म्हटलं माझ्या घरी जाते. तर ते म्हणाले की रिक्षानं का जाते माझ्या बीएमडब्ल्यूमध्ये बस. गाडीत बसल्यानंतर दोन मिनिटं मला असं झालं की मी बोमन इराणीच्या गाडीच बसले. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. मी त्यांना म्हटलं की सर, मी पहिल्यांदा बीएमडब्ल्यूमध्ये बसले. मी या आधी कधीच कोणत्या गाडीत बसले नाही. त्यावर ते म्हणाले की मी पण जेव्हा बसलो होतो तेव्हा पहिल्यांदा बसलो होतो. त्यामुळे हे लक्षात ठेव. जेव्हा आपण इतक आणि त्यातही चांगलं काम करतो, तेव्हा देव नक्कीच तुला काही चांगलं देईल. देव तुला काम पण देईल आणि इतकी प्रगती देखील होईल. त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि मला चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यात असं होतं की सेटवर वातावरण कसं असलं पाहिजे, आपण नेहमी कसं हसतमुख राहायला पाहिजे. प्रत्येक भूमिका कशा मनापासून करायला हव्यात. त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी केलेली कॉमेंट नेहमीच माझ्यासोबत राहिल."
नम्रताच्या कार्यक्रमाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या 'हास्यजत्रा' या कार्यक्रमात दिसत आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी नम्रता एकदा येऊन तर बघा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात 'हास्यजेत्रे'तील अनेक कलाकार दिसणार आहेत.