मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी विरूद्ध फसवणुकीचा आरोप दाखल करण्यात आला होता. सोनाक्षी सप्टेंबर २०१८ मध्ये एका कार्यक्रमासाठी स्टेज शो करणार होती. सोनाक्षीला यासाठी २४ लाख रुपयेही दिल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पैसे घेऊनही सोनाक्षी कार्यक्रमासाठी हजर झाली नाही. याप्रकरणी सोनाक्षीसह आणखी ५ जणांवर उत्तरप्रदेशमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.
मोरादाबाद पोलीस या प्रकरणी सोनाक्षीचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत दाखल झाले. सोनाक्षी जुहू भागात राहते. त्यामुळे मोरादाबाद पोलिसांनी याप्रकरणी जुहू पोलीस स्टेशनची मदत घेण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी पोलीस सोनाक्षीच्या घरी पोहचले त्यावेळी ती घरी नसल्याने पोलिसांना पुन्हा परतावे लागले.
मात्र अद्याप मोरादाबाद पोलीस मुंबईमध्ये सोनाक्षीचा जबाब नोंदविण्याच्या प्रयत्नात आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांची टीम पुन्हा एकदा सोनाक्षीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाऊ शकत असल्याची माहिती आहे.
सोनाक्षीच्या व्यपस्थापन टीमने, सोनाक्षीविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असून केवळ सोनाक्षीची प्रतिमा खराब करण्यासाठी हे केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सोनाक्षीने सध्या तिच्या आगामी 'खानदानी शफाखाना' चित्रपटामुळेही चर्चेत आहे. सोनाक्षी सध्या 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून २०२० मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.