Darbar : 'आय एम अ बॅड कॉप....', म्हणत रजनीकांत यांची सलमानला टक्कर

पाहा त्यांच्या चित्रपटाचा अफलातून ट्रेलर 

Updated: Dec 16, 2019, 08:16 PM IST
 Darbar : 'आय एम अ बॅड कॉप....', म्हणत रजनीकांत यांची सलमानला टक्कर title=
दरबार

मुंबई : अभिनेता सलमान खान 'चुलबूल पांडे'च्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच आता त्याला टक्कर देणारा 'दरबार' सजला आहे. हा 'दरबार' आहे, खुद्द सुपरस्टार, थलैवा रजनीकांत यांचा. दाक्षिणात्य कलाविश्वात दमदार अभिनय आणि शब्दांत व्यक्त करता येणार नाही अशा लोकप्रियतेच्या वर्तुळात वावरणाऱ्या रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरही ट्रेंडमध्ये आला आहे.

रजनीकांत या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसत आहेत. यामध्ये त्यांचा अंदाज पाहता क्या बात....! अशीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. अनेकदा रजनीकांत यांच्या अंदाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न कलाकारांकडून केला गेला आहे. पण, 'दरबार'चा ट्रेलर पाहता त्यांच्यासारखे तेच... असं म्हणणं वावगं ठरत नाही. 

'आदित्य अरुणाचलम' या भूमिकेत झळकणारे रजनीकांत जेव्हा या ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात तेव्हा त्यांच्यापुढे सलमान खानने साकारलेला 'चुलबूल पांडे'सुद्धा फिका पडताना दिसतो. दाक्षिणात्य चित्रपटांमधील धमाल आणि स्टंट या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री नयनतारा आणि सुनील शेट्टीसुद्धा दरबारमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सुनील शेट्टी यामध्ये खलनायकी रुपात दिसेल, तर नयनतारा आणि रजनीकांत यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांसाठी परवणी ठरणार आहे. 

'आय एम अ बॅड कॉप....' असं म्हणत अतिशय गाजलेल्या पद्धतीत चालत येणारे रजनीकांत आणि त्यांचा हा 'दरबार', पुढच्या वर्षी म्हणजेच २०२०मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.