हैदराबाद : गेल्या काही दिवसांपासून एक चेहरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी चर्चेत आला आहे. ही कुणी अभिनेत्री वा मॉडेल नाही. पण, ही महिला, हा चेहरा इतका महत्त्वाचा आहे की त्यांना यंदाच्या वर्षासाठी मेट गाला Met Gala 2021 चं बोलावणं आलं होतं. या बोलावण्याचा मान राखत त्यासुद्धा मेट गालाच्या रेड कार्पेटवर गेल्या आणि साऱ्यांच्या नजरा वळवल्या.
हा चेहरा आहे, हैदराहादमधील अब्जधीश व्यावसायिक पी. वी. कृष्णरेड्डी यांच्या पत्नी सुधा रेड्डी यांचा. सुधा रेड्डी यांनी यंदाच्या मेट गालामध्ये जात असंकाही केलं जे करण्यासाठी दीपिका आणि प्रियांकालाही वेळ लागला होता. यंदाच्या वर्षी असं करणाऱ्या त्या एकमेव भारतीय ठरल्या. मेट गालाच्या रेड कार्पेटवर यंदाच्या वर्षी दिसणारा एकमेव भारतीय चेहरा ठरला सुधा रेड्डी यांचा.
कोण आहेत पी. वी. कृष्णरेड्डी ?
भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सुधा रेड्डी यांचे पती पी. वी. कृष्णरेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे. ते Megha Engineering and Infrastructure चे संचालक आहेत. मेट गालाच्या रेड कार्पेटवर येणाऱ्या प्रत्ये सेलिब्रिटीचा आपला असा वेगळा अंदाज असतो. सुधा रेड्डी यांनी यंदा हेच सारं वातावरण अनुभवलं.
खासगी जेट विमानानं त्या न्यूयॉर्क येथे पोहोचल्या आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. सुधा रेड्डी यांचा ड्रेस फाल्गुनी शेन पीकॉक या डिझानर लेबलकडून तयार करण्यात आला होता. अतिशय सुरेखरित्या त्यांचा हा गाऊन डिझाईन करण्यात आला होता. खांद्यांवर सोनेरी पॅच असण्यासोबतच या गाउनला एका स्लिटसह लांबलचक टेलही देण्यात आली होती. त्यांच्या या संपूर्ण लूकमध्ये गणपतीची झलक असणारी पर्स कमालीची चर्चेत आली.