मुंबई : न्यूयॉर्क शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या फॅशन आणि कलाविश्वातील काही महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे मेट गाला. फॅशनची समज आणि काही भन्नाट थीमना रेड कार्पेटवर अवतरलेलं पाहण्याची ही परवणी. असा हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. मेट गाला २०१९ सध्याच्या घडीला चर्चेत आहे ते म्हणजे या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर लागलेल्या बॉलिवूडच्या हजेरीबद्दल. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण हे हिंदी कलाविश्वात प्रसिद्धीझोतात असणारे चेहरे यंदाच्या मेट गालाच्या रेड कार्पेटवर आले आणि फॅशन विश्वाच्या नजरा या सौंदर्यवतींवरच खिळल्या.
प्रियांका या कार्यक्रमासाठी तिचा पती, अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत आली. तर, दीपिका मात्र या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एकटीच आली. तिच्या येण्यानंतर अदा, सौंदर्य आणि नजाकतीचा सुरेख अंदाजच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. २०१७ पासून मेट गालामध्ये उपस्थित राहणाऱ्या दीपिकाने पहिल्या दोन वर्षांमध्ये आपल्या लूकविषयी संमिश्र प्रतिसाद मिळवल्यानंतर यंदाच्या वर्षी मात्र उणिवांना वावच दिला नाही.
गुलाबी रंगाचा घेरदार आणि पायघोळ गाऊन, त्याला साजेशी केशभूषा आणि तितकाच शोभणारा मेकअप या लूकला तिने प्राधान्य दिलं होतं. कोणा एका बाहुलीइतकीच दीपिकाही सुंदर दिसत होती. custom Zac Posen gown हा तिच्या लूकमधील मुख्य आकर्षणाचा विषय ठरला. गुलाबी रंगाचा हँडबँड तिचा हा लूक परिपूर्ण करून गेला. सोशल मीडियावर दीपिकाच्या या लूकचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. तर, फिल्मफेअरनेही तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती हॉटेलमधून तिच्या कारपर्यंत जाताना दिसत आहे. अशातही तिच्या चेहऱ्यावर असणारं हास्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.