मुंबई : 'राझी' फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत त्यासोबत अत्यंत भावूक असं कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोमध्ये मेघना यांच्यासोबत अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसत आहे. हे दोघंही येत्या काळात 'छपाक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचं काम पूर्ण झालं, ज्या निमित्ताने मेघना गुलजार यांनी मालतीची साथ सुटतानाच्या वेळी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली.
'छपाक' या चित्रपटात दीपिका मालतीच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपासून तिच्या या चित्रपटातील लूकची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. दीपिकासाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये ती एका ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या एका तरुणीची भूमिका साकारणार आहे.
लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ला पीडितेच्या आयुष्यावर या चित्रपटाचं कथान बेतलेलं आहे. २००५ मध्ये लक्ष्मीवर अॅसिड हल्ला झाला होता. एका आव्हानात्मक भूमिकेला न्याय देणाऱ्या दीपिकानेही चित्रीकरण्याच्या अखेरच्या दिवशी एक भावनिक पोस्ट लिहिली होती. 'माझ्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं', असं तिने लिहिलं.
दीपिकाच्या या पोस्टवर तिचा पती, रणवीर सिंह यानेही या चित्रपटाबद्दल सोशल मिडियावर लिहलं की, 'या चित्रपटासाठी मीसुद्धा खुप जास्त उत्सुक आहे'. अतिशय संवेदनशील अशा या चित्रपटाच्या प्रती कलाकारांना वाटणारी आत्मियता आणि त्याविषयीचं कुतूहल पाहता हा 'छपाक' बॉक्स ऑफिसवर गाजणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे