प्रेमाचं हेच नातं कसं खुलतं हे सांगणारी 'माझा होशील ना' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. एका अनोख्या कुटुंबाची आणि हळुवार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेत गौतमी देशपांडे ही प्रमुख भूमिका साकारतेय आणि या निमित्ताने तिच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. मालिकेत सर्व अभिनेत्यांच्या फौजेत तू एकटीच अभिनेत्री दिसतेय, त्याबद्दल काय सांगशील?
मला तर खूपचं मजा येतेय. माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे कारण याआधी मी कधीच इतक्या कलाकारांमध्ये काम केलं नव्हतं. या मालिकेत सासू सुनेचं भांडण नाही आहे. या मालिकेत सासऱ्यांची फौज आहे आणि त्यांच्या घरात जेव्हा सून म्हणून एक स्त्री येते तेव्हा काय घडत हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. इतके सगळे अभिनेते असल्यावर एक अभिनेत्री म्हणून त्यांची एनर्जी मॅच करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
२. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील?
एक खूप गोड आणि कॉन्फिडन्ट अशी सईची व्यक्तिरेखा मी साकारतेय. सई मला माझ्या खूप जवळची वाटते. श्रीमंत वडिलांची मुलगी असली तरी तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. घरी आई-वडील तिची खूप काळजी घेणारे आहेत पण प्रेमाचा ओलावा त्या घरी कमी आहे. ती माणसांना जोडून ठेवणारी आहे. ती थोडी हट्टी आहे पण तिचे हट्ट देखील अवाजवी नाही आहेत. ती अवखळ आणि चंचल आहे, जितकी खळखळून ती हस्ते तितक्याच पटकन ती रुसणारी आहे त्यामुळे मी सईच्या व्यक्तिरेखेला खूप रिलेट करू शकते.
३. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत तू काम करतो आहे, हा अनुभव कसा आहे?
मला वाटतं कि दिग्गज कलाकारांसोबत काम मजा हीच आहे कि तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये काही तरी नवीन नवीन शिकत जाता. दिग्गज कलाकार समोर असल्यावर चांगलं काम डिलिव्हर करायचं दडपण पण असतं पण मी त्याला दडपण म्हणण्यापेक्षा त्या कलाकारांसाठी असलेली आदरयुक्त भीती म्हणेल. गेली अनेक वर्ष हे कलाकार इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून खूपचं शिकायला मिळतंय. ते आम्हाला खूप सांभाळून घेतात.
४. सेटवरील वातावरण कसं असतं, तुम्ही ऑफस्क्रीन काय धमाल करता?
सेटवर तर खूपच धमाल वातावरण असतं. मी आणि विराजास आम्ही खूप जुने मित्र आहोत तसेच अप्पांसोबत हे ४ लोक सेटवर खूपच धमाल करतात. सेटवर सगळ्यात लहान कोणी असेल तर त्यांची माजामस्करी करणं हे चालूच असतं. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन धमाल चालू असते. आम्ही गाणी गातो कधी कधी सेटवर. त्यामुळे एकंदरीतच वातावरण खूपच हलकंफुलकं असतं.
५. तू मालिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील?
या मालिकेचा विषय खूप वेगळा आहे. जसं मी म्हंटल कि प्रेक्षकांनी आता पर्यंत सासू सुनेची गोष्ट पाहिली आहे. पण या मालिकेत सासरे आणि सून यांचं नातं ते पाहू शकतील. ५ सासरे आणि त्यांच्या घरी एक मुलगी आल्यानंतर त्यांची उडणारी तारांबळ या मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील. एक वेगळं घर आणि वेगळी नाती प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळतील. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या मालिकेचा प्रेक्षक संपूर्ण परिवारासोबत आस्वाद घेऊ शकतील.