Ravi Jadhav Konkan Home Village : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखले जाते. 'नटरंग', 'बालगंधर्व', 'बालक पालक', 'टाईमपास' यांसारख्या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजची दिग्दर्शन-निर्मितीही करताना ते दिसतात. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'ताली' या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले होते. यात अभिनेत्री सुश्मिता सेनने तृतीयपंथीयांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता रवी जाधव यांनी त्यांच्या कोकणातील घराची झलक दाखवली आहे.
रवी जाधव हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. रवी जाधव यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी कोकणातील माघी गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन दाखवले आहे. यात व्हिडीओच्या सुरुवातीला त्यांच्या गावाच्या घराकडे जाणारा रस्ता, गावचं कौलारु आणि चिऱ्यांचे घर, दारापुढे असलेले मोठे तुळशी वृंदावन आणि देवघरातील गणपती बाप्पा यांसह अनेक गोष्टी दाखवल्या आहेत.
रवी जाधव यांचे मूळ गाव रत्नाजिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे आहे. त्यांनी त्यांच्या माघी गणेश जयंतीनिमित्त गावातील गणेशोत्सवाची झलकही दाखवली आहे. याबरोबरच त्यांनी गावातील नदी, होडी, निरभ्र आकाश, हिरवीगार झाडे आणि लाल मातीचा रस्ताही दाखवला आहे. यावेळी रवी जाधव हे हातात टाळ घेऊन गावकऱ्यांसह भजनात रमलेले देखील पाहायला मिळत आहेत.
रवी जाधव यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. "गावी गेलं का मन बेभान होत आणि सोबत गहीवरतही… माघी गणेशोत्सवाला संगमेश्वर तालूक्यातील कासे या माझ्या गावी गेलं की पुन्हा मुंबईला येऊच नये असं वाटत!!!", असे रवी जाधव यांनी म्हटले आहे. रवी जाधव यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
त्यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. "खरचं आहे, गाव ते गाव असतं, गावातून शहरात गेल्यावर बऱ्याच वर्षानंतर समजत की जे शोधायला शहरात आलोय ते तर आपल्या गावातच आहे "सुख", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एकाने "वाह वाह खूप छान, आपल्या प्रथा आपणच सांभाळायला पाहिजेत", अशी कमेंट केली आहे.
दरम्यान रवी जाधव दिग्दर्शित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट 19 जानेवारी 2024 ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात दिग्गज अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार कमी प्रतिसाद मिळाला होता.