Ashwini Mahangade Reply On About ZP School : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. या मालिकेत तिने अनघा हे पात्र साकारले आहे. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुकही पाहायला मिळत आहे. अश्विनी ही वैयक्तिक आयुष्यात सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहे. आता अश्विनीने मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत अश्विनीने संपूर्ण कुटुंबासह मतदान केल्याचे दिसत आहे. या फोटोना कॅप्शन देताना तिने मतदानाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.
"निमित्त होते आजच्या मतदानाचे. आम्ही आमचा हक्क बजावला. आता वातावरणच असे आहे की जो तो, ज्याला त्याला "हा अमुक पक्षाचा, हा तमुक पक्षाचा" असे मनात ठरवून मोकळा होतोय. पण या सगळ्या पलीकडे सर्वसामान्याला #माणूस महत्त्वाचा आहे हेच खरे.
आज पसरणी मध्ये जेवढी माणसं भेटत होती ते सगळेच इतक्या प्रेमाने विचारपूस करत होते. सणासुदीला भेट होत नाही पण आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेवढ्या महिला भेटत होत्या त्या अगदी प्रेमाने कौतुक करत होत्या याचा आनंद वाटला. एकीकडे निवडणुकीमुळे वातावरण तसे गरमच आहे, दुसरीकडे एकंदरीतच उन्हाळा आणि या सगळ्यात माझ्या गावाच्या माता माऊलींनी अगदी चेहऱ्यावरून हात फिरवत केलेले कौतुक याने समाधान वाटले", असे अश्विनी महांगडेने म्हटले.
अश्विनीच्या या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. त्यात त्याने "शाळेची इमारत हालत खूप खराब दिसते सगळ्या सेलेब्रिटीनी मदत करावी. फक्त मतदान वेळेस ५ वर्षांतून एकदा दिसते जिल्हा परिषदेची शाळा", असे म्हटले आहे. त्यावर अश्विनीने सडेतोड उत्तरही दिले आहे. "दादा... पत्रे दिसत असले तरी शाळेची स्थिती उत्तम आहे.. काळजी नसावी. पसरणी गाव तेवढे खंबीर आहे....", असे अश्विनी महांगडे म्हटले आहे. सध्या अश्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, अश्विनी महांगडे सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे. याशिवाय लवकरच अभिनेत्री ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.