मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. बहुतांश ठिकाणी या लॉकडाऊनचं काटेकोरपणे पालनही करण्यात येत आहे. या परिस्थितीमध्ये अनेक व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. अगदी कलाविश्वाच्या व्यासपीठावरील रेलचेलही मंदावली आहे. पण, तरीही सेलिब्रिटी मंडळी मात्र या काळातही चाहत्यांच्या संपर्कात आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येत अशाच एका अभिनेत्याने चाहत्यांना एक सुरेख संदेश दिला आहे. 'झी 24 तास'च्या 'इन्स्टा लाईव्ह' मध्ये चाहत्यांशी संवाद साधताना लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक याने त्याच्या मनातील भीती आणि लॉकडाऊन नंतरच्या काळात परिस्थितीशी कशा प्रकारे सर्वांनीच मेळ साधावा याचा एक अतिशय प्रत्ययकारी संदेश दिला.
'लॉकडाऊन जेव्हा केव्हा संपेल आणि आपण सर्वजण बाहेरच्या जगात येऊ तेव्हा आपण प्रेम सर्वात जास्त शेअर करुया. कारण आता बस्स... घरात बसून एकमेकांविषयीच्या खुप चर्चा झाल्या असतील, खूप जणांविषयी आपण वाईटही बोललो असू, वाईट विचारही केले असतील हे वास्तव पुढे ठेवत खाली दिमाग शैतान का घर', या म्हणीचा त्याने संदर्भ दिला.
'लॉकडाऊननंतरच्या काळात आपण सर्वचजण सकारात्मकता पसरवण्याची प्रतिज्ञा करुयात. कारण या जवळपास दीड महिन्याच्या काळात मानसिक, आर्थिक असा जो काही फटका बसला आहे तोटा झाला आहे, त्यामध्ये खूप जणं विचलित झाले असतील. काहीजणांच्या नोकऱ्या गेल्या असतील, काहीजणांची घरं गेली असतील. पुढे काय करायचं असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असेल. थोडक्यात काय, तर आपण सर्वजण सध्या एकाच नावेतून प्रवास करत आहोत. किंबहुना आपण सर्वजण एकाच गोष्टीचे बळी आहोत. त्यामुळे या परिस्थितून बाहेर पडल्यानंतर एकमेकांमध्ये असणारा तणाव वाढवण्याची कारणं कमी करुयात', असा सुरेख संदेश सुयशने दिला.
उणीधुणी न काढता शक्य तितकं एकमेकांमध्ये प्रेम वाटूया, शक्य तितकी एकमेकांची मदत करुया, या गोष्टीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करुयात. कारण, आधीच आपल्याला आर्थिक, मानसिक, त्यामुळे आता सामाजिक त्रासाची त्यात भर नको. कारण, हा त्रास भरुन निघण्यास जास्त वेळ दव़डला जातो. त्यामुळे हा त्रास उदाहरणार्थ अमुक एका ठिकाणहून आलेल्यांना इथे प्रवेश नाही, परवानगी नाही हे जे अवघड चित्र सुरु होणार आहे, ते न होऊ देण्याचा प्रयत्न करुयात. कारण, इथून पुढे एकमेकांना संबोधताना नकारात्मकता आल्यास वक्तींमध्ये तणाव वाढेल, ते एकत्र येणं अवघड होईल त्यामुळे सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करुयात, या अतिशय प्रत्ययकारी संदेशासह सुयशने जणू चाहत्यांना एक मार्गच दाखवला.