मुंबई : मैत्रीखातर आणाभाका घेणारे अनेकजण आपण पाहिले असतील. पण, मित्राच्या पडत्या काळातही त्याच्या पाठीला पाठ लावून उभे राहणारेच खरे मित्र असतात. मैत्रीची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते. मुळात हे नातंच निस्वार्थ अटींवर तग धरून असतं. अशाच या नात्याची सुरेख बाजू अभिनेता प्रवीण तरडे यांनी सर्वांना दाखवून दिली आहे.
सोशल मीडियावर तरडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जिथं ते आपला मित्र पिट्या, याला त्याच्या कामात थोडा हातभार लावताना दिसत आहेत.
दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाच आता मातीच्या कुंड्या, लहान मडकी यांना मोठी मागणी आहे, ज्याचा वापर किल्ले बनवण्यासाठी केला जातो. तरडे यांच्या मित्राचाही हाच व्यवसाय आहे.
परंपरा आणि व्यवसाय आपण जपलेच पाहिजेत असं म्हणत तरडे यांनी आपला मित्र कशा प्रकारे दरवेळी नातेवाईक आणि कुटुंबाला परंपरागत व्यवसायात मदत करण्य़ासाठी य़ेतो हे सांगितलं.
मित्राच्या व्यवसायात हातभार लावत असतानाच तरडे यांनी अतिशय सुंदर संदेशही सर्वांनाच दिला. कितीही मोठे झालात तरीही कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लागलाच पाहिजे आणि परंपरा जपली गेलीच पाहिजे यासाठी ते आग्रही दिसले.