'मी बायकोला फोन केला...', अंशुमन विचारेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला? म्हणाला 'सतत तेच तेच...'

 विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याबद्दल एक खुलासा केला आहे. 

Updated: Jan 10, 2024, 10:27 PM IST
'मी बायकोला फोन केला...', अंशुमन विचारेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम का सोडला? म्हणाला 'सतत तेच तेच...' title=

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा लाडका अभिनेता म्हणून अंशुमन विचारेला ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे कायमच कौतुक केले जाते. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. या कार्यक्रमाद्वारे त्याने मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाबद्दल एक खुलासा केला आहे. 

अंशुमन विचारे हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. मात्र काही महिन्यांनी त्याने या कार्यक्रमाला रामराम केला. त्यानंतर आता त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम का सोडला याबद्दल भाष्य केले. अंशुमनने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केले. 

"मी तेव्हा प्रचंड कंटाळलेलो"

"महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात मी काम करत होतो. त्यानंतर 2019-20 या दरम्यान सर्वत्र कोरोनाची लाट पसरली. कोरोनामुळे सर्वत्र बबल शूटींगला सुरुवात झाली. त्यावेळी माझी मुलगी 1 ते 2 वर्षांची होती. खरं सांगायचं तर मी तेव्हा प्रचंड कंटाळलो होतो. एखादी गोष्ट एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचली की थांबायचं ही माझी सवय आहे", असे अंशुमन विचारने सांगितले. 

"बायकोचा पाठिंबा"

मला नेहमी काही ना काहीतरी वेगळं करायला आवडतं. जेव्हा काही नवीन गोष्ट घडत नाही, तेव्हा थांबावं असे माझे मत आहे. मी घरी बायकोला फोन केला आणि तिला सांगितलं, मी सुरुवातीला ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ केलं, त्यानंतर ‘फू बाई फू’, मग ‘बुलेट ट्रेन’ केलं आणि आता हास्यजत्रा...., मला आता तेच तेच करून कंटाळा आला आहे. माझी अभिनेता म्हणून प्रगती होत नाही. त्यामुळे मी थोडावेळ थांबतो. 

त्यावर ती म्हणाली, "मला चालेल. आपण सगळं सांभाळून संसार करू, आमटी-भात खाऊन राहू. तिचं हा सपोर्ट आणि तिची साथ ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. हास्यजत्रा सोडल्यावर कोरोना काळात मी 1 वर्ष काहीही काम करत नव्हतो. पण या काळात मला कुटुंबाचा, घराचा खूप आधार मिळाला”, असेही अंशुमन विचारे यावेळी म्हणाला.
 
दरम्यान अंशुमन विचारे हा सध्या एका नाटकात झळकत आहे. तो 'राजू बन गया जेंटलमन' या नाटकात झळकत आहे. या नाटकात त्याच्यासोबत उमेश जगताप, अमृता फडके, विनम्र भावल, संदीप कांबळे हे कलाकार झळकत आहेत.