'जात सांगायची लाज का वाटावी?', 'त्या' पोस्टवरुन अभिजीत केळकरने पुष्कर जोगला झापलं

Pushkar Jog BMC Post : सर्वेक्षणासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी जात विचारली असता त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरुन अभिनेता पुष्कर जोगवर सगळीकडूनच संताप व्यक्त केला जात आहे. असं असतानाच अभिनेता अभिजीत केळकरने पुष्करला खडेबोल सुनावले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 30, 2024, 10:18 AM IST
'जात सांगायची लाज का वाटावी?', 'त्या' पोस्टवरुन अभिजीत केळकरने पुष्कर जोगला झापलं title=

Abhijeet Kelkar vs Pushkar Jog : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी महिला कर्मचाऱ्यांनी अभिनेता पुष्कर जोगला जातीची विचारणा केल्यावरुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टमध्ये अभिनेत्याने महिला कर्मचारी नसती तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या अशाप्रकारची भाषा वापरली होती. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुष्कर जोगवर कारवाईची मागणी देखील केली होती. 

या सगळ्या वादात आदात अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट करून पुष्कर जोगला झापलं आहे. पालिका कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत असतात. मी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. ज्याचा मला सार्थ अभिमान आहे... अशा प्रकारची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिजीत केळकरने पुष्कर जोगला खडे बोल सुनावले आहेत. पालिका कर्मचाऱ्याला हे काम करत असताना कोणत्या त्रासातून जावं लागतं. तिथपासून ते आपली जात सांगायला लाज का वाटावी इथपर्यंत सगळे प्रश्न विचारले आहेत. 

पुष्कर जोगची मूळ पोस्ट 

‘प्रश्न विचारणारी कर्मचारी महिला नसती तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपा करून हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील’ या आशयाची मूळ पोस्ट अभिनेता पुष्कर जोगने लिहिली आहे. 

कारवाईच्या मागणीनंतर माफीनामा 

पुष्कर जोगच्या या पोस्टवरुन संतापाची लाट उसळली. पालिका कर्मचाऱ्यांच्या संघटनेने कारवाईची मागणी केली. यानंतर अभिनेत्याने BMC कर्मचारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितली.

अभिजीत केळकरची पोस्ट 

मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे,माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती...तिच्याबरोबर,तिला, तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण ह्या कामात,अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे,मदत केली आहे...उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून, ही कामं करावी लागतात,वरून आदेश आला की त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं,दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात,ते काही त्यांच्या मनातले नसतात...
तुझ्या पोस्टच्या अनुषंगाने तुला काही प्रश्न विचारावेसे वाटतात...

अभिनेता अभिजीत केळकरच्या या पोस्टवरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण आणि त्यावरुन जातीचा मुद्दा हा विषय थांबण्याचे काही नाव घेत नाही.

शरद पोंक्षेची प्रतिक्रिया 

अभिजीत केळकरच्या या पोस्टवर अभिनेता शरद पोंक्षे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,'माझ्या घरी सुध्दा नगरपालीका वाले आले होते मी त्यांना चहा पाणी विचारल व मी ब्राह्मण आहे मला कसलीच सवलत नको म्हणून नोंदही नको अस नम्रपणे सांगीतल त्यावर हसून ते निघून गेले.दरवाजावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही संस्कृती आहे आपली .नकार सुध्दा नम्रपणे देता येतो.'