'हैदराबाद' घटनेनंतर मनवानंही कथन केला 'थरकाप' उडवणारा प्रसंग

पण मी वेळीच तिथून निघाले नसते तर...

Updated: Dec 4, 2019, 07:16 AM IST
'हैदराबाद' घटनेनंतर मनवानंही कथन केला 'थरकाप' उडवणारा प्रसंग  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : हैदराबादमधील 27 वर्षीय महिला डॉक्टरवर पाशवी बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून निघाला. या हत्याकांडावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर या हत्याकांडावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. असं असतानाच अभिनेत्री मनवा नाईकने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अभिनेत्री मनवा नाईकने 30 नोव्हेंबर रोजी तिच्यासोबत प्रवासात घडलेला प्रकार शेअर केला आहे. मनवा म्हणते की,'गेल्या महिन्यात मी हरियाणा ते दिल्ली असा रात्री साडेनऊच्या सुमारास प्रवास करत होते. हृदयात धडधड सुरू होती. मनात निर्भयाचे विचार घोळत होते. मोबाइलमध्ये गुगल मॅप सुरू होता, नवरा माझ्या संपर्कात होता. विमानतळावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मनोमन प्रार्थना करत होते. टोल प्लाझाला गाडी थांबली तेव्हा गणवेशातील ९ पुरुषांचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यातला एक मला बघून गाणं गाऊ लागला. त्या क्षणात माझ्या हृदयाचे ठोके थांबले होते. चालकानं तिथून लवकरात लवकर गाडी काढावी, असं वाटत होतं. त्याप्रमाणे त्यानं काढलीही. पण मी वेळीच तिथून निघाले नसते तर...

ही पोस्ट शेअर करत मनवाने आपली भावना व्यक्त केली आहे. 26 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास हैदराबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आलं. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. या हत्याकांडाचे चारही आरोपी पकडण्यात आले असून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत म्हटलं आहे.