मुंबई : प्रसिद्ध मल्याळम अभिनेता श्रीजीत रवीला (Sreejith Ravi) पोलिसांनी अटक केली आहे. POCSO कायद्यातर्गंत पोलिसांनी त्याचावर कारवाई करण्यात आली. दोन अल्पवयीन मुलांना गुप्तांगं दाखवल्याचा आरोपाखाली श्रीजीत रवीला अटक झाली. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 11 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 4 जुलैला घडली. दोन अल्पवयीन मुलींसोबत कारमध्ये असताना त्यानं त्यांच्याशी गैरवर्तन केलं. कारमधून बाहेर पडताना श्रीजीत रवीने गुप्तांगांचं प्रदर्शन केलं. या घटनेसंदर्भात मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. श्रीजीत रवीने आपलं वागणं योग्य नसल्याचं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
यापूर्वीही श्रीजीतवर झाला होता आरोप
श्रीजीत रवीवर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. मीडिया अहवालानुसार, 2016 मध्ये पालक्कडच्या 14 शालेय विद्यार्थीनींच्या समूहाने श्रीजीत रवीवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. काही वेळातच जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी विद्यार्थीनींच्या पालकांनी पोलिसांवर आरोप करत पोलीस स्टेशनची तोडफोड केली.
कोण आहे श्रीजीत रवी?
श्रीजीत हा प्रसिद्ध अभिनेता टीजी रवी यांचा मुलगा आहे. श्रीजीत हा मल्याळम चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2005 मध्ये 'मायोखाम' या चित्रपटातून श्रीजीतने मॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'चंथुपोट्टू' या चित्रपटातून श्रीजीतला मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर मल्याळम आणि तमिळ चित्रपटांतून श्रीजीतचा चित्रपटाचा धडाका सुरु झाला. मिशन 90 डेज, Punyalan Agarbattis आणि Punyalan Private Limited यात श्रीजीत झळकला आहे. तर विनयन दिग्दर्शित पथोनपथम या आगामी चित्रपटात श्रीजीत दिसणार आहे.