मुंबई : अभिनेता कुणाल खेमूने आयुष्यातील जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. रविवारी कुणालच्या आजीचं निधन झालं, ज्यामुळे खेमु कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. आजीला श्रद्धांजली वाहत कुणालने मुलगी इनायासोबत आजीचा फोटो पोस्ट केला आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने आजीच्या निधनानंतर भावना देखील व्यक्त केल्या आहेत. सध्या कुणालची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भावना व्यक्त करत कुणाल म्हणाला, 'आज मी माझ्या आजीला गमावलं आहे. आम्ही तिला माजी म्हणायचो. आयुष्यात तिने हे नाव प्रचंड मोठं केलं. ती प्रत्येकावर प्रचंड प्रेम करायची. आयुष्य सोप्या पद्धतीत जगण्यासाठी ती प्रचंड मेहनत घ्यायची...'
पोस्टमध्ये कुणालने आजी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पोस्टच्या शेवटी अभिनेत्याने आजी मी तुला कधीही विसरणार नाही... असं लिहिलं आहे. कुणालच्या पोस्टवर भूमी पेडणेकर, सोफी चौधरी, नेहा धुपिया, करण जोहर, दिया मिर्झा, श्वेता बच्चन, राजकुमार राव यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, कुणाल खेमुच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. बालकलाकार म्हणून त्याला प्रचंड प्रसिद्धीही मिळाली होती.
यानंतर, तो मुख्य अभिनेता म्हणून सिनेमांमध्येही झळकला, परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याने कलयुग, ट्रॅफिक सिग्नल, ढोल, गोलमाल सीरीज, गो गोवा गॉन, मलंग अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.