मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोकडे सगळे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. या शोचे हे 14 वे पर्व सुरु आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे सुत्रसंचालन अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करतात. शोमध्ये येणारे अनेक स्पर्धक मोठी रक्कम जिंकत आहेत. यंदाच्या पर्वात आता पर्यंत शोला एकच व्यक्ती करोडपती मिळाली होती. दुसरीकडे आणखी एका नेटकरी शोचा दुसरा करोडपती तर ठरला मात्र, ते काही क्षणासाठीच... त्यानं दिलेल्या चुकीच्या उत्तरानं तो एक कोटींऐवजी केवळ 75 लाख रुपये घरी घेऊन गेला.
'कौन बनेगा करोडपती' च्या शेवटच्या एपिसोडमध्ये, रोलओव्हर स्पर्धक शाश्वत गोयल (Shashwat Goyal) होता, ज्यानं सोमवारच्या एपिसोडमध्ये 75 लाखांच्या प्रश्नावर शेवट केला. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शोमध्ये आला होता. शाश्वतनं संपूर्ण खेळ अतिशय चांगला खेळला आणि त्यानं तीन लाइफलाइन अतिशय काळजीपूर्वक वापरल्या. त्यानं 1 कोटी रुपये जिंकले आणि 7.5 कोटी रुपयांपर्यंत खेळणारा पहिला स्पर्धक ठरला.
एक कोटींसाठी शाश्वतला उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भितरीमध्ये असणारा स्तंभ हा कोणत्या राजवटीमधील राजांची माहिती सांगण्यासाठी एक चांगला स्त्रोत असल्याचं मानलं जातं असा प्रश्न विचारण्यात आलेला. यासाठी पर्याय म्हणून A) शिशुनाग B) गुप्त C) नंद D) मौर्य असे चार पर्याय देण्यात आले होते. बराच विचार करुन शाश्वतनं गुप्त असं उत्तर दिलं. हे उत्तर बरोबर असल्याचं सांगत अमिताभ यांनीच येऊन शाश्वतला मिठी मारली. (kaun banega crorepati 14 contestant gave wrong answer on 7 crore 50 lakh question win 75 lakh only)
पुढे शाश्वतला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात आला. शाश्वतला या प्रश्नासाठी कोणतीही लाइफलाइन वापरता येणार नव्हती. मात्र त्याने अमिताभ यांच्याकडून आपलं उत्तर चुकलं तर नेमके किती रुपये आपल्याला मिळतील असं विचारलं. या प्रश्नावर अमिताभ यांनी 75 लाख असं उत्तर दिलं. त्यामुळेच उत्तर चुकलं तर 25 लाखांचा फटका बसेल मात्र बरोबर आलं तर थेट साडेसात कोटी रुपये जिंकू असं म्हणत शाश्वतनं आपण या प्रश्नाचं उत्तर देणार असं सांगितलं आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
7.5 कोटींसाठी भारतामध्ये तैनात झालेली पहिली ब्रिटीश सैन्याची तुकडी म्हणून कोणत्या तुकडीला ‘प्राइम इन इंडिस’ असं नाव देण्यात आलं होतं? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी शाश्वतला A) 41 वी (वेल्च) रेजिमेंट ऑफ फूट B) पहिली कोल्डस्ट्रीम गार्ड C) पाचवी लाइट इफ्रेंट्री D) ३९ वी रेजिमेंट ऑफ फूट हे ऑप्शन देण्यात आले.
शाश्वतनं बराच वेळ विचार करुन ऑप्शन D) असं उत्तर दिलं. त्यावर अमिताभ यांनी लॉक करु का असं विचारलं असता शाश्वतनं आपलं उत्तर बदलून A) पर्याय निवडला. ‘४१ वी (वेल्च) रेजिमेंट ऑफ फूट लॉक करा’ असं शाश्वतनं सांगितलं आणि त्यानंतर अमिताभ यांनी एक दिर्घ श्वास घेतला आणि हे उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे D) ‘३९ वी रेजिमेंट ऑफ फूट’ होतं.
शाश्वत ज्या प्रकारे गेम खेळला ते पाहून अमिताभ यांना ही त्याचं कौतुक झालं होतं. शाश्वत कम्पॅनियन म्हणून आईच्या जागी कोणालाच आणलं नव्हतं. त्याच्या दिवंगत आईसाठी खुर्ची रिकामी सोडण्यात आलेली. ७५ लाखांचा चेक घेतल्यानंतर सेटवरुन जाण्याआधी तो त्या सीटजवळ जाऊन रडल्याचंही पहायला मिळालं.