कंगनाच्या अडचणी वाढल्या; पोलिसांत तक्रार दाखल

पाहा कोणी केली कंगनाविरोधात तक्रार   

Updated: Oct 14, 2020, 11:16 AM IST
कंगनाच्या अडचणी वाढल्या; पोलिसांत तक्रार दाखल  title=

मुंबई : अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील या क्वीनविरोधात कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्विटरवर सातत्यानं आपलं मतप्रदर्शन करणाऱ्या कंगनाला तिच्या एका ट्विटमुळंच या अडचणीला सामोरं जावं लागत आहे.

काही दिवसांपूर्वीच तिनं शेतकऱ्यांसंबंधी एक ट्विट केलं होतं. ज्यामुळं थेट कर्नाटकात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागील आठवड्यातील न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी Kyatasandra पोलीस स्थानकात शेतकऱ्यांविरोधातील वक्तव्यासंदर्भात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 

वकील एल. रमेश नाईक यांनी ही तक्रार दाखल केल्याचं म्हटलं जात आहे. 'मी दाखल केलेली तक्रार ही बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविरोधात आहे. हे सारंकाही प्रसिद्धीसाठी नव्हे, तर ती जे काही करत आहे ते चुकीचं आहे हे दाखवून देण्यासाठी ही तक्रार आहे. कंगना विचार करते तसं, शेतकरी सरकारच्या एखाद्या कायद्याविरोधात रस्त्यावर येतात याचा अर्थ असा होत नाही की ते दहशतवादी आहेत. मीसुद्धा अशा अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहे. तर, मग मी दहशतवादी आहे? मला या वक्तव्यावर तिचं स्पष्टीकरण अपेक्षित आहे आणि म्हणूनच मी हा खटला लढक आहे', असं नाईक वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाले. 

काय म्हणाली होती कंगना? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा आधार घेत कंगनानं तिची भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळालं. कृषी विधेयकानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं. खुद्द पंतप्रधानांनी एक ट्विट करत बळीराजाला हमी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच ट्विटचा आधार घेत बी- टाऊनच्या क्वीननं तिचं मतही मांडलं होतं.

 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं. ज्याला गैरसमज आहेत ते दूरही करता येऊ शकतात, त्यांची समजूत काढता येऊ शकते. पण, झोपण्याचं आणि काहीही न समजल्याचा अभिनय कोणी करत असेल तर तसं सोंग कोणी घेत असेल त्यांना समजावण्यामुळं काय फरक पडणार आहे? CAA ला विरोध करणारे हे तेच दहशतवादी आहेत. CAA विरोधातील आंदोलनात रक्ताचे पाट वाहिले. पण, या कायद्यामुळं एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेलं नाही', असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये लिहिल्याचं पाहायला मिळालेलं. या ट्विटनंतर कंगनावर अनेकांनीच निशाणा साधला होता. आता कंगनाची यावर काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.