Thalaivii Movie Review: सारंकाही असूनही का परिपूर्ण नाही, 'थलैवी'?

जयललिता यांच्या जीवनप्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे

Updated: Sep 8, 2021, 07:07 PM IST
Thalaivii Movie Review: सारंकाही असूनही का परिपूर्ण नाही, 'थलैवी'?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत ( kangana ranaut ) हिची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'थलैवी' या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच बऱ्याच चर्चांना उधाण आलं. बघता बघता अखेर तो दिवस उजाडला, जेव्हा कंगनाचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. भारतीय राजकारणात अत्यंत सातत्यानं लक्ष वेधणाऱ्या जयललिता यांच्या जीवनप्रवासाचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे. (Thalaivii Movie Review:)

राजकारणासोबतच जयललिता यांच्या खासगी आयुष्यावरही चित्रपट भाष्य करतो. जीवनात आलेल्या आव्हानांचा सामना करत पुढे सर्वांसाठी 'अम्मा' होणाऱ्य़ा जयललिता यांचा जीवनप्रवास पाहताना, नकळतच आपण गतकाळात जातो. अनेकांनाच माहिती नसणाऱ्य़ा गोष्टीही चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अभिनय जगतातही एकेकाळी सक्रिय असणाऱ्या जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबतही स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्यासोबतचं नातंही खास होतं. चित्रपटाच्या पूर्वार्धात यावरच प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 

चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये परिस्थितीसोबतच नात्यांची समीकरणंही बदलल्याचं दाखवण्यात आलं आहे. इथं अधिकाधिक नाट्यमय रुप देण्यात आलं आहे. चित्रपटात अनेक गोष्टींमध्ये समतोल राखला गेला आहे. कंगना तिच्या वाट्याला आलेली भूमिका दमदार अंदाजात निभावताना दिसते, तर सहाय्यक कलाकारांचीही तिला चांगली साध मिळते. 

चित्रपटात महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष 
जयललिता यांचा जीवनप्रवास साकारत असताना दिग्दर्शकांनी अनेक गोष्टींची काळजी घेत महत्त्वाच्या सर्व त्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. पण, अशातच एक गोष्ट मात्र हातची निसटली असंच दिसत आहे. जयललिता यांचं साड्या आणि सँडल्सवर विशेष प्रेम. हीच बाब चित्रपट साकारताना काहीशी मागं पडल्याचं कळत आहे. पण, इतर गोष्टी ही कमतरता पुढे येऊ देत नाहीत हेसुद्धा तितकंच खरं.