मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये रीमिक्स गाण्यांचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये कोणत्या ना कोणत्या जुन्या सुपटहिट गाण्याचं रीमिक्स असतं. आता हा प्रकार इतका वाढला आहे की, याला विरोधही होऊ लागला आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या आगामी चित्रपटातील रीक्रिएट होणाऱ्या 'टिप टिप बरसा पानी' या रिक्रिएट गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटात, १९९४ मध्ये आलेल्या 'मोहरा' चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. या गाण्याचं शूटिंग सुरु होण्याआधीच ते चर्चेत होतं. बुधवारी रात्री चित्रपटाचं गाणं शूटही करण्यात आलं. परंतु जावेद अख्तर यांनी 'सूर्यवंशी'च्या निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. जावेद अख्तर गेल्या अनेक दिवसांपासून गाण्यांच्या कॉपी राइटसंदर्भात आवाज उठवत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
'बॉलीवुड लाइफ डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांनी 'जुन्या गाण्यांना गरजेनुसार रिक्रिएट करण्याचा प्रकार थांबला पाहिजे. मी याबाबत आधीही लोकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या आहेत. 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं लिहिणारे आनंद बख्शी साहेब आज आपल्यात नाही, जे विरोध करु शकत असते.'
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' 'सिंघम' आणि 'सिंबा'प्रमाणेच कॉप ड्रामा सीरिजचा भाग असणार आहे. यात अक्षय कुमार एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 'सूर्यवंशी' २७ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.