'माझ्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत...', 'अ‍ॅनिमल' दिग्दर्शकाच्या 'त्या' टीकेनंतर जावेद अख्तर यांचा संताप, म्हणाले 'माझ्या मुलाची...'

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि प्रसिद्ध कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्यात कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या एका प्रतिक्रियेला जावेद अख्तर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Updated: Mar 17, 2024, 06:10 PM IST
'माझ्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत...', 'अ‍ॅनिमल' दिग्दर्शकाच्या 'त्या' टीकेनंतर जावेद अख्तर यांचा संताप, म्हणाले 'माझ्या मुलाची...' title=

Sandeep Reddy Vanga VS Javed Akhtar : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अॅनिमल हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात रणबीरसोबतच बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले. पण या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. या चित्रपटातील काही दृश्यांमुळे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि प्रसिद्ध कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्यात कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. नुकतंच संदीप रेड्डी वांगा यांच्या एका प्रतिक्रियेला जावेद अख्तर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

विषारी पुरुषत्व, हिंसाचार, नग्न दृश्य यांसारख्या अनेक गोष्टींचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात भडिमार दाखवण्यात आल्याने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली. प्रसिद्ध कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनीही या चित्रपटावर टीका करताना “एका चित्रपटातील एक पुरुष महिलेला म्हणतो की माझे बूट चाट, जर एक माणूस म्हणतो की महिलेला थोबाडीत ठेवून दिली तर काय बिघडलं. असे संवाद असणारा सिनेमा सुपरहिट होणं ही अत्यंत घातक बाब आहे.” असे वक्तव्य केले होते. त्यावर संदीप रेड्डी वांगा यांनी दुसऱ्यांच्या कामावर बोट ठेवण्याआधी त्यांनी आधी आपल्या मुलाचे काम पहावे, असे म्हटले होते. 

जावेद अख्तर काय म्हणाले?

त्यावर आता जावेद अख्तर यांनी संदीप रेड्डी वांगा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  यावेळी जावेद अख्तर म्हणाले, जेव्हा त्यांनी मला प्रत्युत्तर दिले, तेव्हा माझ्यासाठी तो सन्मान होता. माझ्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना माझा एकही चित्रपट, एकही स्क्रिप्ट, एकही सीन, एकही संवाद, एकही गाणं टीका करायला मिळाले नाही. त्यामुळे त्यांना माझ्या मुलाची एक टीव्ही मालिका शोधली. ज्यात फरहानने ना अभिनय केलाय, ना दिग्दर्शन केलंय, ना काही लिहिलंय. फक्त फरहानच्या कंपनीने त्याची निर्मिती केली होती. 

आजकाल एक्सेल एंटरटेनमेंट सारखी मोठी कंपनीदेखील अनेक गोष्टी तयार करत असते आणि त्यापैकी ही एक गोष्ट आहे. पण माझ्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत तो माझ्यातील काहीही चूक बाहेर काढू शकला नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे? मला 'ॲनिमल' चित्रपटाबद्दल कोणतीही अडचण नाही, पण तो प्रेक्षकांमध्ये किती लोकप्रिय आहे याची मला काळजी वाटते, असे जावेद अख्तर यांनी म्हटले. 

संदीप रेड्डी काय म्हणाले होते?

दरम्यान याआधी संदीप रेड्डी यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करताना फरहानबद्दल वक्तव्य केले होते. “त्यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्ट झालं की त्यांनी चित्रपट पूर्णपणे पाहिलेला नाही. एखादी व्यक्ती चित्रपट न पाहताच त्यावर भाष्य करत असेल तर त्याला मी तरी काय करणार? आजवर जेवढ्या लोकांनी या चित्रपटावर टीका केली आहे, त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय ते पाहायचे कष्ट का घेतले नाहीत? जावेद अख्तर यांनी हीच गोष्ट त्यांचा मुलगा फरहानला का सांगितली नाही, जेव्हा तो ‘मिर्झापूर’सारखी सीरिज बनवत होता. त्या सीरिजमध्ये जगातल्या सगळ्या शिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मी तर ती सीरिज पूर्णपणे पाहिली देखील नाही. तुम्ही जर ती सीरिज पाहिलीत तर तुम्हाला देखील उलटी येईल. त्यामुळे जावेद अख्तर हे त्यांच्या मुलाच्या कामावर का लक्ष ठेवत नाहीत?” असे संदीप रेड्डी यांनी यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावर आता जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.