जान्हवी-कार्तिक 'दोस्ताना २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला

'दोस्ताना'च्या ११ वर्षांनंतर 'दोस्ताना २'ची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jun 27, 2019, 01:39 PM IST
जान्हवी-कार्तिक 'दोस्ताना २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'दोस्ताना' चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला. प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. आता 'दोस्ताना' प्रदर्शित झाल्याच्या ११ वर्षांनंतर 'दोस्ताना २'ची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यावेळी प्रियंकाच्या जागी जान्हवी कपूर भूमिका साकारणार आहे तर अभिषेक आणि जॉनपैकी एका भूमिकेसाठी कार्तिक आर्यनचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

कार्तिक आर्यननंतर आता करणकडून दुसऱ्या अभिनेत्याचा शोध अद्याप सुरु आहे. वरुण धवन, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या स्टाककिड्सला यशस्वीरित्या लॉन्च केल्यानंतर आता करण कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. 

'दोस्ताना' चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केलं होतं. 'दोस्ताना २'चं दिग्दर्शन कॉलिन डी कुन्हा करणार आहेत. कॉलिन डी कुन्हा 'दोस्ताना २'मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. करणने 'कार्तिकसोबत हा पहिला चित्रपट आहे आणि आम्ही त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्साही असल्याचं' म्हटलंय.

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनबाबत आकर्षक बाब ही आहे की, धर्मा प्रोडक्शन हाऊसकडे सुरुवातीपासूनच 'दोस्ताना' हे शिर्षक आहे. १९७६ मध्ये करणचे वडिल यश जोहरद्वारा सुरु करण्यात आलेल्या बॅनरखाली १९८० मध्ये 'दोस्ताना'सोबतच आपली सुरुवात केली होती. १९८० मध्ये आलेल्या 'दोस्ताना' चित्रपटाचं राज खोसला यांनी दिग्दर्शन केलं होतं. तर अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आणि जीनत अमान यांनी भूमिका साकारली होती. या 'दोस्ताना'लाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आता 'दोस्ताना २' काय कमाल करणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.