मुंबई : काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे त्यांच्या कुटुंबियांसोबत दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर ट्रम्प आणि मुलगी इवांका (Ivanka Trump) यांचे मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यात आता गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) देखील इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
दिलजीतच्या या पोस्टमध्ये तो आणि इवांका ताजमहालच्या बाहेर एका बाकावर बसलेले दिसत आहेत. दिलजीतच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. इवांका आणि त्याच्या फोटोमुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. इवांका आणि स्वत:चा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शन देखील दिलं आहे.
दिलजीतने इवांका यांचा एक फोटो एडीट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोमध्ये तो आणि इवांका एका बाकावर बसलेले दिसत आहेत. 'मी आणि इवांका..., मागेचं लागली होती ताजमहालला जायचं आहे...ताजमहालला जायचं आहे... तर मी तरी काय करणार गेलो घेवून.' असं कॅप्शन त्यानं या पोस्टला दिलं आहे.
त्याच्या या पोस्टला इवांकाने देखील गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे. 'दिलजीत मला ताजमहालला घेवून जाण्यासाठी तुझे आभार.' दिलजीतचे आभार तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मानले आहेत. सध्या इवांका यांचे नानाप्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामध्ये त्यांच्या मुलीची म्हणजेच इवांकाची जास्तच चर्चा झाली. या चर्चांना सर्वाधिक वाव दिला तो म्हणजे या मीम्सने, असं म्हणायला हरकत नाही. इवांका देखील या मीम्सचा आनंद घेताना दिसत आहे.