'इतनी शक्ती हमे दे न दाता..',. फेम गायिकेवर उतारवयात हलाखीची परिस्थिती

फार प्रसिद्धीझोतात न आल्यामुळे त्या गाण्याचे गायक मात्र काळाच्या ओघात कुठे मागे पडतात. 

Updated: Aug 10, 2021, 03:34 PM IST
'इतनी शक्ती हमे दे न दाता..',. फेम गायिकेवर उतारवयात हलाखीची परिस्थिती title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : काही गाण्यांची आपली अशी एक वेगळी जादू असते. ज्यामुळं काळ कितीही पुढे गेला तरीही या गाण्यांची लोकप्रियता किंवा त्यातून मिळणारी सकारात्मक उर्जा काही केल्या कमी होत नाही. अनेकदा असं होतं की गाणं लक्षात राहतं पण, फार प्रसिद्धीझोतात न आल्यामुळे त्या गाण्याचे गायक मात्र काळाच्या ओघात कुठे मागे पडतात. 

सध्या अशाच एका गायिकेची हलाखीची परिस्थिती पाहून मनाला पिळ बसत आहे. 'अंकुश' (Ankush) चित्रपटातील 'इतनी शक्ति हमें देना दाता' (Itani Shakti Hamein Dena Data) हे गाणं आठवतंय का तुम्हाला? आजही (कोविड लॉकडाऊनमुळे शाळा बंद होईपर्यंत) अनेक शाळांमध्ये रोजची प्रार्थना म्हणून हे गाणं दर दिवशी वाजवलं जात होतं. हे गाणं गायलं होतं, पुष्पा पगधरे (Pushpa Pagdhare) यांनी. 

युट्यूबवरही या गाण्याच्या ओरिजनल स्कोअरला विशेष पसंती आहे. लाईक्स आणि लोकप्रियतेच्या बाबतीत गाणं कुठेच कमी नाही. पण, त्याच्या गायिका मात्र बिकट परिस्थितीच्या डोहात आहेत. किमान निवृत्तीवेतनासाठीही त्यांना लढा द्यावा लागत आहे. 

वेळीच पैसे मिळत नाहीत 
Pushpa Pagdhare यांना मानधन म्हणून राज्य शासनाकडून 3150 रुपये मिळतात. पण, तेही वेळेवर नाही. मागील 35 वर्षांमध्ये कोणत्याही संगीत कंपनीनं रॉयल्टी म्हणून एकही पैसा दिलेला नाही. सध्या पुष्पा मच्छीमार कॉलनीमध्ये राहतात. इथं त्यांना दैनंदिन खर्चासाठीही बराच संघर्ष करावा लागतो. 

हल्लीच्या काळात रिअॅलिटी शो ला पसंती देणाऱ्या पुष्पा यांच्या मते नव्या जोमाच्या कलाकारांना चांगलं मानधन मिळतं. आमच्या वेळी निर्माते ठरवून देतील तितकंच मानधन मिळत होतं. किंबहुना सर्वांच्याच तोंडी असणाऱ्या 'इतनी शक्ती... ' गाण्यासाठी त्यांना अवघं 250 रुपये इतकं मानधन मिळालं होतं. काळ बदलला, परिस्थितीतीही बदलली पण, या साऱ्यामध्ये पुष्पा मात्र अपवाद ठरल्या, तेव्हा किमान आता उतारवयात तरी त्यांचा संघर्ष संपावा हीच कामना.