मुंबई : ‘अॅनाबेल',‘द कॉनज्युरिंग’नंतर आता ‘इट’हा हॉलिवूडचा भयपट बॉक्सऑफिसवर धूमाकूळ घालत आहे.
८ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात सुमारे ११.७२ कोटी डॉलर्सची कमाई केली आहे.
‘इट’ने ‘पॅरानॉमल अॅक्टिव्हिटी ३’या भयपटाने रचलेला रेकॉर्ड मोडला आहे. २०११ मध्ये ‘पॅरानॉमल अॅक्टिव्हिटी ३’ सिनेमाने पहिल्या दिवशी ५.२६ कोटी डॉलर्सची कमाई केली होती. दोन भागात बनवल्या गेलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
जगभरात ‘दंगल’या भारतीय चित्रपटाने २००० कोटींची तर ‘बाहुबली २’ सिनेमाने १,७२५ कोटींची कमाई केली आहे. 'इट' ची बॉक्सऑफिसवर होणारी घोडदौड पाहता हा सिनेमा या दोन्ही चित्रपटाचे रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
'इट' सिनेमाची कथा काय ?
'इट' या सिनेमाची कथा डेर्री शहरापासून सुरू होते. येथे एक भूत जोकरचे कपडे घालून शहरातील लहान मुलांना घाबरवत असतो. एका ७ वर्षांच्या मुलाचे जोकर अपहरण करतो आणि नंतर त्याला खाऊन टाकतो. हळूहळू अनेक मुलांची शिकार केल्याच्या घटनांनंतर शहरातील मुलांना त्याविषयी माहित होते. 'इट'मधील भूताने तयार केलेल्या वस्तू फक्त लहान मुलांनाच दिसत असतात. मोठ्यांना त्याबाबत काहीच माहित नसते. भेदरलेली मुले या जोकरचा कशाप्रकारे सामना करतात याची रंजक सफर चित्रपटामध्ये मांडली आहे.