प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचं यंदाचं १००वं वर्ष आहे. यानिमित्त मराठी चित्रपट व्यावसायिकांनी शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची १५ डिसेंबर रोजी वार्षीक सभा आहे. महामंडळानं हा सोहळा दिमाखात साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही.
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो चित्रपटाच माहेरघर असणा-या कोल्हापूरात.. १९१९ ते २०१९ असा मुकपटांपासुन मराठी बोलपटांपर्यंतचा हा प्रवास... कोल्हापूरची चित्रनगरी याची साक्षीदार राहिली आहे. या निमित्तानं कोल्हपूरातील मराठी चित्रपट व्यावसायिक समितीनं कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा आयोजित केलाय.
कोल्हापूरात अनेक चित्रपट तयार झाले. या चित्रपटाचे साक्षिदार असणाऱ्या स्डुडिओ आणि इतर बाबींची प्रतिकृती कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलीये. यामध्ये जयप्रभा स्डुडीओ आणि शालीनी स्डुडीओचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी चित्रपट व्यवसायातील अनेकांनी खारीचा वाटा उचलला आहे.
चित्रपट महामंडळातील काही संचालकांनी शताब्दीपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम साजरा करावा, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्याकडे फारसं गांभिर्यानं कुणी बघितलं नाही. त्यामुळे शहरातील व्यावसायीकांनी हा सोहळा आयोजित केला. तीन दिवस हा कार्यक्रम रंगणार आहे.
१५ डिसेंबरला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षीक सभा कोल्हापूरातच होतेय. त्याआधीच हा सोहळा होतोय. महामंडळानं रस दाखवला नसला तरी कोल्हापूरकरांन आपल्या चित्रसृष्टीच्या देदिप्यमान इतिहासाचा निश्चित अभिमान आहे.