Raju Punjabi Death: हरियाणातील प्रसिद्ध गायक राजू पंजाबीचं निधन झालं आहे. पहाटे 4 वाजता हरियाणाच्या हिसार रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. राजू पंजाबीचं वयाच्या 40 व्या वर्षीच निधन झालं असून, कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच हरियाणी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. राजू पंजाबीने देसी देसी ना बोल्या कर, सॉलिड बॉडी, तू चीज लाजवाब अशी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4 वाजता राजू पंजाबीचं निधन झालं. प्रकृती बिघडल्याने राजू पंजाबीला हिसार येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हिसार हरियाणातील एक उद्योन्मुख गायक म्हणून आपली ओळख निर्माण करत असलेल्या राजू पंजाबीच्या निधनाने सर्व इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
राजू पंजाबी गेल्या अनेक दिवसांपासून हिसारच्या एका खासगी रुग्णालयात दाखल होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याला कावीळ झाली होती अशी माहिती आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. यानंतर त्याला डिस्चार्जही देण्यात आला होता. पण घरी गेल्यानंतर त्याची तब्येत पुन्हा एकदा खालावली होती. यामुळे 40 वर्षीय गायकाला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याने अखेरचा श्वास घेतला.
प्रदीप बुरा आणि पूजा हुड्डा यांच्यासह हरियाणी इंडस्ट्रीशी संबंधितांनी गायकाच्या आकस्मिक निधनाने मोठं नुकसान झालं असल्याचं म्हटलं आहे. राजू पंजाबीच्या पार्थिवावर त्यांच्या रावतसर गावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हरियाणातील प्रसिद्ध गायक असणाऱ्या राजू पंजाबीने एकापेक्षा एक अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. देसी-देसी, सॉलिड बॉडी, तू चीज लाजवाब, सँडल अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्याने गायली आहेत. हरियाणातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सपना चौधरीसह त्याने अनेक सुपरहिट गाणी केली आहेत.
'देसी-देसी ना बोल्या कर' या गाण्याने त्याला उत्तर भारतात प्रसिद्धी मिळवून दिली होती. राजू पंजाबीचं 'आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था' हे शेवटचं गाणं ठरलं. 12 ऑगस्टला हे गाणं प्रदर्शित झालं होतं.