मुंबई : अमुक एक व्यक्ती केव्हा कोणाच्या प्रेमात पडते तेव्हा त्यांचं जग त्या व्यक्तीपुरताच सीमीत होतं. ही व्यक्ती म्हणजे आपलं सर्वस्व, त्याच्यासोबतच वेळ व्यतीत करावा, त्याच्याशीच सतत बोलावं असंच वाटत राहतं.
मुळात प्रेम करणं हा काही गुन्हा नाही. पण, प्रेम करताना इतर गोष्टींचं भान राखणंही तितकंच महत्त्वाचं. प्रेमाच्या अशाच एका जबाबदार नात्याचा अनुभव एका अभिनेत्रीनं घेतला.
तिनं ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तो तिच्याच मैत्रिणीचा पती होता म्हणून या नात्याची जास्त चर्चा झाली. या अभिनेत्रीचं नाव आहे स्मृती इराणी. (Smriti irani)
अभिनय क्षेत्रातून सध्या राजकारणात सक्रीय असणाऱ्या आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या स्मृती इराणी या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. स्मृती यांच्या मैत्रीणीशी त्यांचं लग्न झालं होत. या व्यक्तीचं नाव झुबीन इराणी.
मैत्रिणीमुळंच तिची झुबीन यांच्याशी भेट झाली आणि पाहता पाहता त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. 1998 मध्ये इराणी यांनी मिस इंडियामध्ये सहभाग घेतला पण, त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही.
पुढे त्यांनी अभिनयाचा मार्ग निवडला. ऑडिशन देण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख झुबीन यांच्याशी झाली होती. एक वेळ अशीही आली जेव्हा यांच्या भेटीगाठी वाढल्या. बोलणं वाढलं. स्मृती इराणी यांनी झुबीन यांच्याकडून सल्लेही घेण्यास सुरुवात केली.
'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेच्या यशानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. कुटुंबाशी झुबीनसोबतच्या नात्याबाबत त्या बोलल्या. झुबीन यांनीही आपल्या आईला स्मृती यांच्या घरी पाठवत लग्नाची बोलणी पुढे नेली.
पाहताक्षणी स्मृती यांच्या कुटुंबानं झुबीन यांना पसंत केलं. या लग्नात कोणाचाही अडसर नव्हता. कुटुंबाच्या विरोधात जाऊन स्मृती यांना संसार थाटायचा नव्हता. त्यामुळं परवानगी मिळताच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली.
अखेर 2001 मध्ये या जोडीच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. पुढे मुलांच्या जन्मानंतर स्मृती यांनी कलाजगतातून काहीशी विश्रांती घेतली. ज्यानंतर त्यांनी आपली वाट राजकारणाच्या दिशेनं वळवली.
आजच्या घडीला त्या देशातील केंद्रीय मंत्रीमंडळात विराजमान असणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहेत. पतीची साथ, विश्वास आणि प्रेम यांच्या बळावर त्यांनी इतका दूरचा पल्ला गाठला.