मुंबई : बॉलिवूडची दिग्गज दिवंगत अभिनेत्री आणि एकेकाळी लाखो-करोडो हृदयांची धडधड बनलेल्या मधुबाला हिचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीत झाला होता. १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा होत असला तरी मधुबाला यांना 'हृदया'नंच दगा दिला, असं म्हणायला हरकत नाही. 'बॉलिवूडची मर्लिन मन्रो', 'ब्युटी विथ ट्रॅजडी' म्हणूनही मधुबालाचा उल्लेख केला जातो. याच मधुबाला यांच्या जन्मदिवसानिमित्तानं गूगलनंही त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. या डुडलमध्ये मधुबालाचा कलरफुल फोटो दिसतोय. हा फोटो दिलीप कुमार यांच्यासोबतचा तिचा सुपरहीटच नाही तर 'ऐतिहासिक' सिनेमा ठरलेल्या 'मुगल ए आझम' या सिनेमातून घेतला गेलाय.
१९४९ मध्ये आलेल्या 'महल' सिनेमातलं 'एक तीर चला, दिल पे लगा...' हे गाणं लागलं आणि अनेकांना मधुबालाची आठवण आली नाही तरच नवल... मधुबाला यांचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी... आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी 'बसंत' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या १४ व्या वर्षिी १९४७ साली त्यांनी राज कपूर यांच्या 'नील कमल' सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून नाव मिळवलं.
मधुबाला यांनी अभिनेते किशोर कुमार यांच्याशी विवाह केला होता. परंतु, आजारी पडल्यानंतर मात्र त्या एकाकी पडल्या होत्या. दोन महिन्यांतून एकदा किशोर कुमार त्यांची भेट घेण्यासाठी जात असत. मधुबाला यांच्या हृदयाला छेद होता. शस्त्रक्रियेनंतरही जास्तीत जास्त दोन वर्ष त्या जिवंत राहू शकतील, असं डॉक्टरांनीही सांगितलं होतं. आपल्या वाढदिवसाच्या सात दिवसानंतर २३ फेब्रुवारी १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
‘दिलीप कुमार : द सबस्टेन्स ऍन्ड द शॅडो’ या आपल्या आत्मचरित्रात दिलीप कुमार यांनी मधुबाला यांचा उल्लेख एक चांगली कलाकार आणि जीवनाविषयी आत्मियता असणारं एक जिंदादिल व्यक्तीमत्त्व असा केलाय. दिलीप आणि मधुबाला यांनी १९५१ मध्ये पहिल्यांदा ‘तराना’या सिनेमात काम केलं होतं. दिलीप-मधुबालाची जोडी प्रेक्षकांना भावल्यामुळे ‘मुगल ए आजम’ या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दिग्दर्शक के. आसिफ खूपच खुश होते. दिलीप यांच्याविषयी वाटणारं प्रेम मधुबालानं आसिफसमोरही व्यक्तही केलं होतं. पण, याच दीर्घकाळ चाललेल्या या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान मधुबाला आणि दिलीप यांच्यातील नातं ताणलं गेलं होतं.
मधुबालाचे पिता अताउल्लाह खान यांची स्वत:ची सिनेनिर्माण कंपनी होती आणि ते एकमेव व्यक्ती होते ज्यांना या दोन्ही फिल्मी सिताऱ्यांना एकाच छताखाली पाहण्यात सर्वात जास्त आनंद होता... दिलीप कुमार यांनी केवळ आपल्याच कंपनीसाठी काम करावं, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, आपल्या करिअरची दोरी दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायला दिलीप कुमार तयार नव्हते. हेच कारण ठरलं मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात तणाव निर्माण होण्याचं...
त्या दिवसांच्या आठवणीत दिलीप लिहितात, ‘आमच्या संबंधातला गोडवा निघून जात असल्याची चाहूल जेव्हा मला लागली तेव्हा आसिफनं हे नातं पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले. ते मधुबालासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करत होते पण भलं होवो मधुबालाच्या वडिलांचं ज्यांनी आमच्या होणाऱ्या लग्नाचा व्यावहारिक संबंध जोडण्याचा प्रयत्न केला’... जेव्हा मुगल-ए-आझमचा प्रसिद्ध मोरपंखाचा सीन शूट होतं होता तेव्हा तर दोघांमध्ये साधं बोलणंही बंद झालं होतं. या दृश्यात शूटींग दरम्यान जेव्हा आमच्या दोघांच्या ओठांदरम्यान केवळ ते मोरपंख होतं, तेव्हा आमच्यातल्या संभाषणाचा शेवट झाला होता. एव्हढंच काय आम्ही एकमेकांना दुआ-सलामही करत नव्हतो’… हे दृश्यं म्हणजे केवळ दोन पेशेवर कलाकारांचा अंदाज आणि कलेच्या प्रती समर्पणाचं प्रतिक आहे. ज्यामध्ये दोघांनी आपापले खाजगी वाद बाजूला ठेऊन दिग्दर्शकाच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं.
मधुबाला आणि त्यांचे वडील या दोघांशीही मी अनेक वेळा साफ मनानं बोलण्याच प्रयत्न केला पण, आपल्या मनातील दुविधा समजून घेण्यासाठी कुणीही तयार नव्हतं... आणि सरते शेवटी या नात्याचा एक दु:खद अंत झाला, असंही दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय.