मुंबई : प्रसिद्ध नृत्य व सिने दिग्दर्शक रेमो डिसोजाकडे पंधरा वर्षांपासून निष्ठेने काम करणारा एक सहकारी आनंदकुमार उर्फ ॲन्डी अचानक गायब झाला.
उत्कृष्ट डान्सर असलेला, सुपरस्टार रजनीकांत, सलमान खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय-बच्चन ते अगदी अलिकडचे वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ पर्यंत सर्वांना व्यक्तिगत नृत्याचे धडे देणारा आणि रेमो डिसोजाचा उजवा हात म्हणून फिल्म इंडस्ट्रीत ओळखला जाणारा ॲण्डी संपूर्ण ग्रुपमध्ये कुणालाच काहीही न सांगता २०१७ पासून काम सोडून गेला. रेमोने अनेकांकडे त्याच्या न येण्याबद्दल विचारले पण कुणालाच त्याचा थांगपत्ता नव्हता. मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण नंबर बदललेला होता. त्यामुळे रेमोही हतबल झाला.
अखेर वर्षभरानंतर म्हणजे फेब्रुवारी २०१८ मध्ये ॲन्डीने गुरूवर्य रेमो सरांना फोन केला. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रेमोनेही त्याला तातडीने बोलावून घेतले. तो गेला. रेमो काही बोलण्याच्या आधी तो गुरू रेमोच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, 'सर! मैने एक फिल्म डीरेक्ट की है, सालभर उसमेंही व्यस्त था|' ॲण्डीचे हे वाक्य ऐकून रेमोची अवस्था म्हणजे 'जोर का झटका' बसल्यासारखीच झाली.
अचानक गायब झालेला जीवाभावाचा सहकारी वर्षभर काहिही थांगपत्ता लागू न देता सिनेमाचे दिग्दर्शन करत होता, हे समजल्यावर रेमो काही क्षण नाराज झाला. पण, त्याच क्षणी आपला विश्वासू शिष्य आपल्याच पावलावर पाऊल ठेवून चाललाय, ह्या गोष्टीचा त्याला तितकाच आनंदही झाला. मग रेमोनं न रागवता त्याला मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या.
येत्या ३० मार्च रोजी अॅन्डीचा गावठी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. केवळ कोरीयोग्राफीच नव्हे तर उत्तम दिग्दर्शन आणि पटकथाही लिहिलेल्या चित्रपटातील इमोशन्स, रोमान्स, कॉमेडीही सरस असल्याचं रेमोनं म्हटलंय.
आनंदकुमार उर्फ ॲन्डी हा वयाच्या चौथ्या वर्षी कुटुंबासह तामिळनाडू येथून मुंबईत मुंलुंड येथे स्थायिक झाला. मुलुंडच्या वाणी विद्यालयात त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. कारण, प्रभुदेवाच्या डान्स स्टाईलने झपाटलेला ॲन्डी रोज टीव्ही लावून एकलव्याप्रमाणे गुरू प्रभुदेवाकडून नृत्याचे धडे गिरवत होता. चार वर्षे त्याने भरपूर स्ट्रगल करून कसेबसे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा यांच्या ग्रुपमध्ये साईड डान्सर म्हणून स्थान मिळविले. पण, नंतर ॲण्डीने मागे वळून पाहिलेच नाही. साईड डान्सर, डान्स ट्रेनर, असिस्टटन्ट कोरीयोग्राफर ते बड्या सुपरस्टार्सना तो व्यक्तिगत डान्स स्टेप शिकवू लागला.
गुरू रेमो डिसोजा यांनी दिग्दर्शित केलेल्या ए बी सी डी, ए बी सी डी-२ आणि फ्लाईंग जाट या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. संपूर्ण आत्मविश्वास आल्यावर त्याने कथालेखक आणि निर्माते सिवाकुमार रामचंद्रन यांच्या ‘गावठी’ ह्या कथेवर पटकथा रचली आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. गावठी... हा शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आत्मविश्वास देणारा, मनोरंजनाचा पावर पॅक असलेला ‘गावठी’ हा चित्रपट असल्याचं तो सांगतो.