Gautami Patil : लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. गौतमीचे लाखो चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक चांगलीच गर्दी करून असतात. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या कार्यक्रमामध्ये चांगलाच विरोध झाला होता. त्यानंतर आता कोकणातील सिंधुदुर्गमध्ये गौतमीचा कार्यक्रमाला देखील रद्द करण्यात आलं आहे. तिच्या कार्यक्रमांसाठी प्रेक्षक उत्सुक असताना अचानक आता तिचा शो रद्द करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. ते निमंत्रण व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या कार्यक्रमाचा विरोध केला होता. हा विरोध करत अनेकांनी कमेंट केल्या की भगवान परशुरामाच्या पावन भूमीत असा कार्यक्रम होऊ देणार नाही. यानंतर आता आयोजकांनी काही तांत्रिक कारण असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ही बातमी मिळताच एकीकडे विरोधकांना आनंद झाला आहे तर दुसरीकडे गौतमीच्या चाहते. मात्र, निराश झाले आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी अम्युझमेंट सेंटरने प्रोटेक्शनसाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडे अर्ज देखील केला होता. मात्र या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणारा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
7 आणि 8 ऑक्टोबरला कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमी पाटील लावणी आणि डीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी माहिती दिली. गौतमीचा कार्यक्रम रद्द झाला असला तरी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे एक स्त्रोत आणखी आहे. ते म्हणजे, 7 ऑक्टोबरला देवगड अम्युझमेंट सेंटरमध्ये जो 'चला हवा येऊ द्या'तील कलाकारांचा 'कॉमेडीचे सुपरस्टार' हा कार्यक्रम होणार होता, तो ठरल्याप्रमाणे होणार आहे. या कार्यक्रमातून 'चला हवा येऊ द्या'तील कलाकार प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहेत. या कार्यक्रमाविषयी देवगड अम्युझमेंट सेंटरचे धैर्यशील पाटील यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.
हेही वाचा : काय सांगता! 9 वर्षे जुना वाद विसरून सलमान- अरिजीत सिंग आले एकत्र
गौतमीविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘घुंगरू’ असं आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला गौतमीचं वेड लागलं आहे त्यामुळे तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी चर्चा सुरु आहे.