Gashmeer Mahajani Post: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani Death) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळले होते. शनिवारी 15 जून रोजी ही घटना उघडकीस आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते दिवसांपूर्वीच झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याच्यावर टीका करण्यात येत होती. या सर्व टीकेवर पहिल्यांदाच गश्मीरने उत्तर दिलं आहे. (Gashmeer Mahajani Post)
गश्मीर महाजनीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. तसंच, वेळ आल्यावर नक्कीच बोलेन, असं म्हटलं आहे. गश्मीरच्या या पोस्टने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेना पूर्णविराम मिळेल अशी शक्यता आहे.
रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवर व दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाबाबत व अभिनेता गश्मीर महाजनीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तीन दिवसांपासून त्यांच्या कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क का साधला नाही? असा सवाल केला जात आहे. नेटकऱ्यांच्या या टीकेला आता गश्मीरने अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.
गश्मीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे की, 'अभिनेता हा कायम अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केले. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत. शिव्याही देत आहेत आणि आम्ही त्याचंही स्वागत करतो.'
'आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच,' अशी पोस्ट करत गश्मीरने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रविंद्र महाजनी हे पुण्यातील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. शनिवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी याबाबत त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला याबाबत माहिती दिली.