Madhuri Dixit In Bhool Bhulaiyaa 3 : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत भूल भुलैया या चित्रपटाचे नाव कायमच पाहायला मिळते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन हे मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटानंतर याचा दुसरा भाग म्हणजेच भूल भुलैया 2 हा चित्रपट लोकप्रिय ठरला होता. या दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बू हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या चित्रपटानंतर आता भूल भुलैया 3 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 'भूलभुलैया 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. याची एक झलकही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'भूलभुलैया 3' या आगामी चित्रपटात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री विद्या बालन आणि तृप्ती डिमरी या दोघीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यासोबतच भूलभुलैयाच्या आगामी भागात माधुरी दीक्षितही झळकणार असल्याचे बोललं जात आहे. आता याबद्दल दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी भाष्य केले आहे.
अनीस बज्मी यांनी हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'भूलभुलैया 3' या चित्रपटात माधुरी दीक्षित झळकणार की नाही याबद्दल भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, "आम्ही या चित्रपटात कोण-कोण कलाकार झळकणार याबद्दलची घोषणा लवकरच करणार आहोत. तसेच या चित्रपटाबद्दल जे काही होईल, त्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती देऊ. यापूर्वीच आम्ही तृप्ती डिमरी आणि विद्या बालनच्या नावाची घोषणा केली आहे. पण अजून यातील बऱ्याच कलाकारांच्या नावाची घोषणा बाकी आहे. यातील काही जणांनी अद्याप कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले नाही. तर काही जणांसोबत अजूनही चर्चा सुरु आहे. त्यामुळे आम्ही लवकरच कलाकारांबद्दल घोषणा करु", असेही अनीस बज्मी यांनी सांगितले.
"काही दिवसांपूर्वी अनीस बज्मी यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली आहे. याबद्दलही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केले. माझा एक पाय तुटला आहे. शस्त्रक्रियेनंतर मी लगेचच शूटींग सुरु करण्याचा विचार करत होतो. पण ते शक्य नाही. पण जेव्हा मी शूटींग करतो, तेव्हा मला वेदना कमी होतात. मी आता व्हिलेचअर चालवायला शिकलो आहे. त्यामुळेच मी याचा वापर करुन संपूर्ण सेटवर फिरत असतो. पण जेव्हा मला चढ-उतार करायचा असतो, तेव्हा मला दोन लोकांची मदत लागते", असे त्यांनी म्हटले.
"सध्या आम्ही मुंबईत शूटींग करत आहोत. आमचे शूटींग हे एखाद्या पिकनिकप्रमाणेच असते. माझ्या चित्रपटांचे बहुतांश सेट हे असेच असतात. माझ्या कलाकारांनी तणावाखाली काम करावे असे मला वाटत नाही. ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाच्या शूटींगनंतर मी नो एंट्री या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन करणार आहे. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होईल", असेही अनीस बज्मी यांनी सांगितले.