मातीशी नाळ जोडलेल्या एका युवा दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी..

अहमदनगर जिल्हा तसा ग्रामीण भाग म्हणूनच ओळखला जातो. अ.नगर शहराला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. नगर जिल्यात ब-याच जणांचा प्रमुख व्यवसाय हा शेती. जिल्ह्यातील खडकीमधल्या अशाच एका शेतकरी कुटुंबात  महेश काळे जन्माला आला.  महेश हा रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा.

Updated: Sep 15, 2017, 08:46 PM IST
मातीशी नाळ जोडलेल्या एका युवा दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी..    title=

पोपट पिटेकर , प्रोडक्शन एक्झिकिटीव्ह झी 24 तास मुंबई : अहमदनगर जिल्हा तसा ग्रामीण भाग म्हणूनच ओळखला जातो. अ.नगर शहराला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. नगर जिल्यात ब-याच जणांचा प्रमुख व्यवसाय हा शेती. जिल्ह्यातील खडकीमधल्या अशाच एका शेतकरी कुटुंबात  महेश काळे जन्माला आला.  महेश हा रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा.

शेतक-याचं घर म्हटल की मुलांना घरातील सर्व काम करावीच लागतात. त्यात महेश कसा काय मागे राहणार... घरात शेती व्यतिरिक्त गायी, म्हशी, कोंबड्या इत्यादी प्राणी घरात हमखास पाळणारं हे  काळे कुटुंब.

खेड्यात जन्म झाल्यानं महेशला ग्रामीण भागाची खूपच आवड. ग्रामीण भागात राहत असल्याने शेतीतील कामे करायला महेशला खूप आवडायचं. शेतातील आणि घरातील सर्व कामे तो  नेहमी न चुकता करत असे. शेण झाडलोट करण्यापासून ते जनावरांना वैरण टाकणं, गायी म्हशींच दूध काढणं अशी सर्व कामं तो करायचा. 

शेतकऱ्याचं पोरं झालं डायरेक्टर.... 

ग्रामीण भागात चालत आलेली शेती आणि नोकरी धंद्याव्यतिरिक्त वेगळं काही करण्यास सहसा कोण धजावत नाही. मात्र, एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला, अंगाला शेणामुताचा वास असलेला  महेश कधी चित्रपट निर्मितीकडे वळेल असं कुणाला वाटलं नव्हतं. मात्र, महेशनं वेगळी वाट चोखाळली आणि मराठी चित्रपट निर्मितीकडे तो वळला. कलेचा कुठलाही वारसा नसलेल्या महेशनं 'घुमा' या  वास्तववादी चित्रपटाची निर्मिती केलीय. या क्षेत्रात पाय रोवलेल्या आणि स्वत:ची मक्तेदारी सांगणा-या कलाकारांना फाटा देत, नव्या चेह-यांच्या मदतीने 'घुमा' साकारण्यात आलाय.  ग्रामिण भागातील शिक्षण व्यवस्था आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फुटणारं पेव यावर हा चित्रपट भाष्य करतो.  

महेश काळेंचा सिनेप्रवास... 

येत्या 29 सप्टेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येतोय. मात्र त्याआधीच हा चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरलाय. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवात आपला ठसा उमटवला आहे. 54 व्या महाराष्ट्र राज्य फिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पदार्पण निर्मिती पुरस्काराने घुमाला सन्मानित करण्यात आले.  तसंच  पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऑडियन्स चॉईस अवॉर्ड पटकाला. त्याचबरोबर अनेक चित्रपट महोत्सवात 'घुमा'चं रसिक आणि समीक्षकांनी तोंडभरुन कौतुक केलं. आताही 'घुमा'च्या आकर्षक प्रोमोमुळे रसिकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. एका दिवसात घुमाच्या प्रोमोला सहा हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे येत्या 29 सप्टेंबरला घुमा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा इतिहास घडवणार यात काही शंका नाही. 

 

कसा वळला डायरेक्शनकडे...

शेतातील काम करत करत महेशने आर्ट्सची पदवी पूर्ण केली. शिक्षण आणि कामातून जसा  वेळ मिळेल तसा मित्रांबरोबर गावातील समस्यांवर नेहमी चर्चा होत असे. त्याच वर्षी महेशनं  B.A पूर्ण केलं. आता पदवी तर मिळवली, पण पुढे काय करायच? शेती की शिक्षण? असा  प्रश्न पडलेला असताना महेशच्या डोक्यात वेगळाच विचार चालू होता. बरेच मित्र सांगायचे की हे कर ते कर... महेशने मात्र कधी त्याच्याकडे लक्ष दिल नाही. कारण महेशला काही तरी वेगळीच वाट निवडायची होती... त्यानं न्यू आर्टस् कॉलेज इथं मास कम्युनिकेशनबद्दल ऐकल होतं. त्याबद्दल महेशला थोडीफार माहिती होती. त्यामुळं ज्या वाटेने आपल्याला जायचं आहे ती वाट नेमकी जाते कुठे, याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली होती. शेवटी त्याने मास कम्यूनिकेशन विभागात प्रवेश घेतला.

कम्युनिकेशन स्टडीजने बदललं आयुष्य....

कॉलेज सुरु झाल्यावर पूर्ण दिवस अभ्यासमध्ये जायचा . कॉलेज संपल्यावर पुन्हा घरी जाऊन गाय, म्हशीला  वैरण पाणी करणं, धार काढणं अशी कामं तो करायचा. हे सर्व  करत करत कॉलेजच एक वर्ष कसं संपलं हे कळलच नाही. परंतू नगरला आल्यानंतर महेशच्या विचारात, वागण्यात, बोलण्यात एक वेगळाच बदल दिसून येत होता. तो म्हणजे एखाद्या गोष्टीवर वेगऴ्या पध्दतीने विचार करणं. कुठे तरी त्याची क्षमता वाढलेली दिसत होती. आपल्या ग्रामीण भागात काय समस्या आहेत हे त्याला चांगलच कळायला लागलं होतं. अशातच आपल्या गावातील लोकांना कोणकोणत्या समस्या येतायत याचा विचार महेश करायला लागला. दुस-या वर्षामध्ये शिकत असताना आपल्या गावात काय चालय या गोष्टींवर  त्यानं लिखान करायला सुरुवात केली.
 

पहिली शॉर्ट फिल्म... 

 
 गावात ज्या समस्या आढळतात त्या  विषयावर लिखाण करत असताना कॉलेजमध्ये एक शॅार्ट फिल्म बनवायचा प्रोजेक्ट आला. त्या प्रोजेक्टमध्ये  "रुपया " नावाची शॉर्टफिल्म त्यानं बनवली. ती बनवल्यानंतर अनेक शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये पाठवली. अनेक फेस्टिवलमध्ये 'रुपया' या शॉर्ट फिल्मला पुरस्कार देखील मिळाले. असेच अनेक फेस्टिव्हल गाजवत असताना सत्यजित रे कोलकत्ता शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये 'बेस्ट डायरेक्टर' हा मानाचा पुरस्कार 'रुपया'ला मिळाला.. तेव्हा कॉलेजमध्ये ढोलताशे वाजवत मोठा जल्लोष साजरा केला गेला. सर्वत्र फक्त ..महेश...महेश..महेश.. असा एकच आवाज घुमू लागला. 

 कुठून आली घुमाचे प्रेरणा...

 
 रुपयाच्या यशानंतर एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास महेशमध्ये निर्माण झाला. आपण काही तरी करु शकतो हे या पुरस्कारने सिध्द झालं, असे वाटायला लागलं. मग आता काही तरी वेगळं लिहायला पाहिजे असा विचार सुरू झाला. एक दिवस  मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमातील शाळा या विषयावर चर्चा चालू  होती. महेश ला हा विषय खूप मोठा आणि गंभीर असल्याचं लक्षात आलं.  या विषयाला हात घालायला पाहिजे हे लक्षात आल्यावर शाळा हा विषय निवडून त्यानं लिखान सुरु केलं. बघताबघता एक वर्ष उलटलं. लिखान पूर्ण झालं. ब-याच जणांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर मराठी चित्रपट बनला पाहिजे, असं ब-याच जणांनी बोलून दाखवलं. या विषयावर चित्रपट तयार करायचा याचा निश्चय करुन त्यावर काम करायला महेशनं सुरुवात केली.

मित्रांनी दिली साथ....

 
 चित्रपट तयार करायचा म्हटलं की त्यासाठी चांगली टीम हवी. मग चांगल्या सहका-यांच्या शोधात असताना, कॉलेजमध्ये शॉर्ट फिल्म बनवताना ज्या मित्रांनी मदत केली होती ते मित्र  न्यूज चॅनलमध्ये आणि इतर ठिकाणी काम करत होती. त्यांना सोबत घेत आपल्याला चित्रपट तयार करायचा हा निर्धार त्यानं केला. त्यासाठी  त्यानं आपल्या सर्व मित्रांना एकत्र आणलं.  खूप शोध घेतल्यानंतर चित्रपटासाठी प्रोड्यूसर मिळाला. चित्रपट बनवायला मोठा खर्च येणार असल्यानं प्रोड्यूसरकडून काही रक्कम आणि स्वत:चा काही पैसा टाकायचा निर्णय त्यानं घेतला. अखेर प्री-प्रोडक्शनच काम सुरू झालं. बघताबघता सा-या गोष्टी जुऴून आल्या आणि अथक प्रयत्नानंतर ब-याच गोष्टीचा सामना करत करत चित्रपटाचं शुटींग सुरु झालं. 

 अजय- गुरू ठाकूर साथीला... 

 
 अवघ्या 25 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर नगरमध्येच  चित्रकरण पूर्ण  करण्यात आलं. या चित्रपटासाठी अविनाश मकासरे, विक्रम शंकपाळे, मंगेश जोंधळे, अजय थोरात, नाना मोरे, नवनाथ खराडे अशा अनेक जिवलग मित्रांनी आणि नगरच्या कम्युनिकेशन डिपार्मेंटमधील शिक्षक, मित्रांनी  खूप मदत केली. या टीमने नवख्या कलाकारांना संधी देत हा चित्रपट पूर्ण केला हि विशेष बाब. या सिनेमाला ग्रामीण टच असून,  गुरु ठाकूर यांनी दोन गाणी लिहिली आहेत. तर संगीत जसराज जोशी, ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांनी दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केलं असून, गाणी अजय गोगावले , प्रिया बर्वे आणि मुग्धा हसबनीस यांनी गायली आहे. 

मातीचा गंध असलेला घुमा... 

 'घुमा' येत्या 29 सप्टेंबरला आपल्या भेटीला येत आहे. आपण अनेक मनोरंजन करणारे चित्रपट पाहतो. पंरतु हा चित्रपट मनोरंजना व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रातील वास्तव मांडणारा आहे. ग्रामीण भागातील शाळा, ग्रामीण जीवन, जीवन जगण्याची धडपड अशा अनेक गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहयाला मिळणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच  प्रोमो प्रदर्शित झाला. एका दिवसात घुमाच्या प्रोमोला सहा हजार व्ह्यूज मिळाले आहेत. एका दिवसात एवढ्या जणांनी जर चित्रपटाचा प्रोमो पाहिला असेल तर नक्कीच हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडविल्या शिवाय राहणार नाही. तुम्हीही या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी आणि ग्रामीण भागातील हुशार तरुण दिग्दर्शकाला बळ देण्यासाठी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन मित्र, कुटुंबासह 'घुमा' पाहवा.