सतीश कौशिक यांच्या हत्येचा संशय व्यक्त होत असतानाच नवा व्हिडीओ आला समोर

Satish Kaushik Viral Video: बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर त्यांच्या हत्येची शंका उपस्थित केली जात आहे. याचं कारण म्हणजे सतीश कौशिक यांनी ज्या फार्महाऊसमध्ये होळी (Holi) साजरी केली त्या फार्महाऊसच्या मालकावरच हत्येचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या पत्नीनेच हा आरोप केला असल्याने त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे. यादरम्यान सतीश कौशिक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.   

Updated: Mar 13, 2023, 10:46 AM IST
सतीश कौशिक यांच्या हत्येचा संशय व्यक्त होत असतानाच नवा व्हिडीओ आला समोर title=

Satish Kaushik Video: बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची हत्या केलाचा आरोप फार्महाऊसच्या मालकावर करण्यात आला आहे. विकास मालू (Vikas Malu) यांच्यावर त्यांच्या पत्नीनेच हा आरोप केला आहे. 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा त्यांचा दावा आहे. महिलेने यासंबंधी दिल्ली पोलिसांत तक्रारही केली आहे. यादरम्यान विकास मालू यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी इन्स्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. 

व्हिडीओत सतीश कौशिक सफेद पायजमा आणि कुर्त्यात दिसत असून मनमोकळेपणाने डान्स करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना विकास मालू यांनी म्हटलं आहे की "सतीशजी गेल्या 30 वर्षांपासून माझ्या कुटुंबाप्रमाणे होते. पण जगाला माझ्या नावे खोटे आरोप करण्यात काही मिनिटंही लागली नाहीत".

आम्ही एकत्रितपणे केलेल्या या सेलिब्रेशननंतर घडलेली शोकांतिका मी अद्यापही पचवू शकत नाही आहे असंही ते म्हणाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vikas Malu (@vmkuber)

यावेळी त्यांनी आपण आता मौन सोडत असल्याचं म्हटलं आहे. तसंच या अनपेक्षित घटनांवर कोणाचाही ताबा नसतो असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रत्येकाच्या भावनांचा आदर करा अशी विनंती केली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व सेलिब्रेशनमध्ये सतीशजी यांची आठवण येईल असं त्यांनी सांगितलं आहे. 

फार्महाऊसच्या मालकावर काय आरोप?

फार्महाऊसचे मालक विकास मालू यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केली असून पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनीही तपास सुरु केला आहे. विकास मालू आणि सतिश कौशिक यांच्यात व्यावसायिक संबंध होते आणि त्यातून वाद झाला होता असा त्यांचा आरोप आहे. 

"सतीशजी आणि माझे पती यांच्यात व्यावहारिक संबंधही होते. 2022 मध्ये त्यांच्यात वाद झाला होता. सतीशजी यांनी आपण दिलेले 15 कोटी रुपये मागितले होते. पण माझ्या पतीने भारतात गेल्यावर पैसे देईन असं सांगितलं होतं. मी जेव्हा पतीकडे पैशांची चौकशी केली तेव्हा त्याने आपण सतीश कौशिक यांच्याकडून घेतलेले पैसे करोना काळात गमावल्याच सांगितलं. माझे पती पैसे पुन्हा परत करण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपण ब्ल्यू पिल्स आणि रशियन मुलांची वापर करुन त्यांना दूर करु असंही ते म्हणाले होते. म्हणूनच मी पोलिसांकडे ही माहिती दिली आहे," असं त्या म्हणाल्या आहेत. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात, एका महिलेने केलेल्या आरोपानंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. एक निरीक्षक स्तरावरील अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. महिलेचा जबाब नोंदवला जाईल".