नेटकऱ्यांनी आळवला सूर; आता अनिल कपूरलाच करा मुख्यमंत्री

...यावर अनिल कपूरचं उत्तरही पाहण्याजोगं 

Updated: Nov 2, 2019, 01:31 PM IST
नेटकऱ्यांनी आळवला सूर; आता अनिल कपूरलाच करा मुख्यमंत्री title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. विविध पक्षांना अतिशय मानाच्या अशा या राजकीय लढतीमध्ये कोणावर मात केली, तर कोणी वर्षानुवर्षे सुरु असणाऱ्या राजकीय वादांचा फायदाही घेतला. सध्याच्या घडीला निवडणुकीच्या निकालानंतर नेमकी महाराष्ट्राची सत्ता कोणात्या हाती जाणार आणि मुख्यमंत्री कोण असणार याविषयीच्याच चर्चा सुरु आहेत. 

शिवसेना- भाजप युतीमध्ये असणारा तिढा, त्यातच शिवसेनेला पाठिंबा देतो म्हणणारे काही काँग्रेस नेते, त्यांचा विरोध करणारे काही नेते असं एकंदर गुंतागुंतीचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वत्र या राजकीय घडामोडींविषयीच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी व्हावं, याविषयी आता नेटकरीसुद्धा त्यांत्या परिने काही पर्याय सुचवू लागले आहेत. या पर्यायांमध्ये चक्क एका बॉलिवूड अभिनेत्याचंही नाव पुढे येत आहे. तो अभिनेता आहे, अनिल कपूर. 

मुख्य म्हणजे खऱ्या जीवनात ठाऊक नाही, पण रुपेरी पडद्यावर मात्र अनिल कपूपने मोठ्या प्रभावीपणे मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. 'नायक' या चित्रपटातील त्याची भूमिका कोणीही विसरु शकलेलं नाही. याचाच आधार घेत एका युजरने ट्विट केलं, 'महाराष्ट्रात जेव्हा कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही, तेव्हा अनिल कपूरलाच मुख्यमंत्री केलं जातं. रुपेरी पडद्यावर त्यांची मुख्यमंत्रीपदाची एकदिवसीय कारकिर्द सर्वांनीच पाहिली आहे. त्याची प्रशंसाही केली आहे.' अनिल कपूरची प्रशंसा करत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत ते कसला विचार करत आहेत, असा प्रश्नही केला. 

चाहत्याचं हे ट्विट पाहून त्यावर अनिल कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे. जी पाहता पुन्हा एकदा अनिलने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'मी नायक म्हणूच ठीक आहे', असं मत अनिल कपूरने मांडलं. अनिक कपूर हा रुपेरी प़द्यावर मुख्यमंत्री साकारण्यातच समाधानी असला तरीही आता नेटकऱ्यांमध्ये आणि संपूर्ण राज्चयामध्येच येत्या काळातील मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारी व्यक्ती कोण असणार याचीच उत्सुकता लागली आहे.