'डिस्को डान्सर'च्या दिग्दर्शकावर आर्थिक संकट, पत्नीच्या उपचारासाठीही पैसे नाहीत

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण टप्प्यातून जात आहेत.

Updated: Nov 16, 2021, 05:47 PM IST
'डिस्को डान्सर'च्या दिग्दर्शकावर आर्थिक संकट, पत्नीच्या उपचारासाठीही पैसे नाहीत title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बी सुभाष त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण टप्प्यातून जात आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. ज्यात 'डिस्को डान्सर', 'आंधी तुफान', 'अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन' आणि 'कसम पांडे वाली की' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र आता त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्याकडे पत्नीवर उपचार करण्यासाठीही पैसे नाहीत.

उपचारासाठी 30 लाख रुपयांची गरज 
बी सुभाष यांच्या ६७ वर्षीय पत्नी तिलोत्तिमा मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. तिलोतीमाला यांना फुफ्फुसांशी संबंधित आजार आहे. ज्यासाठी खूप पैसा खर्च केला जात आहे. आता बी सुभाष आणि त्यांच्या कुटुंबियांना या आजारावर उपचार करणं खूप कठीण जात आहे. पत्नीच्या उपचारासाठी 30 लाखांची गरज आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेता हिने लोकांना केटो नावाच्या निधी उभारणी संस्थेत योगदान देण्याचं आवाहन केलं आहे.

पत्नी पाच वर्षांपासून डायलिसिसवर आहे
एका मुलाखतीत संवाद साधताना बी सुभाष यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी गेल्या ५ वर्षांपासून डायलिसिसवर आहे. अलीकडे त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली. यावेळी कोणत्याही असोसिएशनची मदत घेण्याच्या प्रश्नावर बी सुभाष म्हणाले, 'मला वाटत नाही की, यावेळी कोणत्याही असोसिएशनशी संपर्क साधणं व्यावहारिक असेल. जास्तीत जास्त ते आम्हाला काही पैसे देतील. यासाठी माझ्या मुलीने ऑनलाइन योगदानासाठी अर्ज केला आहे.

हॉलिवूडपट बनवण्याचं स्वप्न तुटलं
बी सुभाष यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी कोरोनाच्या आधी त्यांनी 'डिस्को डान्स'च्या रिमेकच्या संदर्भात एका हॉलिवूड प्रोडक्शन कंपनीसोबत करार केला होता. नव्या कलाकारांना घेऊन ते हा चित्रपट बनवणार होते. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला. ते म्हणाले, 'हॉलिवूडसाठी चित्रपट बनवण्याचं माझं स्वप्न होतं. पण आता मी आणखी स्वप्न पाहू शकत नाही. कुटुंब प्रथम, नंतर सगळं काही. मात्र, आता फिल्म इंडस्ट्रीतील लोकही बी सुभाष यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर बी सुभाष यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.