'पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार...', मराठी दिग्दर्शकाच्या 'त्या' पोस्टने चर्चांना उधाण

 सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी दिग्दर्शकाने संताप व्यक्त केला आहे. 

Updated: Mar 15, 2024, 06:54 PM IST
'पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार...', मराठी दिग्दर्शकाच्या 'त्या' पोस्टने चर्चांना उधाण title=

Sameer Vidwans Loksabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची धामधुम पाहायला मिळत आहे. शनिवारी 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. सध्या सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर्स, सोशल मीडिया, रेडिओ, टीव्ही जाहिराती पाहायला मिळत आहे. आता यावर एका मराठी दिग्दर्शकाने संताप व्यक्त केला आहे. 

मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक म्हणून समीर विध्वंसला ओळखले जाते. समीर अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. तो अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करताना दिसतो. नुकतंच समीरने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहे. यात त्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक ट्वीट केले आहे. 

समीर विध्वंसचे ट्वीट चर्चेत

"सगळ्या FM चॅनल्सवरच्या कंटाळवाण्या जाहिराती पुढचे २,३ महिने डोक्यात ही जाणार!  सुरूवात तर झालेली आहेच. अतोनात पैशाच्या जोरावर ओंगळवाणा भडिमार...ज्याकत्याक (IYKYK)" असे ट्वीट समीरने केले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. समीरची ही पोस्ट सध्या व्हायरलही होताना दिसत आहे. 

आणखी वाचा : Electoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक निधी!

समीर विध्वंसची कारकिर्द

दरम्यान समीर विध्वंसने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'आनंदी गोपाळ', 'लोकमान्य', 'डबल सीट', 'धुरळा', 'टाईम प्लीज', 'लग्न पाहावे करुन', 'क्लासमेट्स', 'वायझेड', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', 'सायकल' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. त्याने 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून तो घराघरात पोहोचला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याने लोकमान्य या चित्रपटामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांची भूमिका साकारली होती. समीरने आतापर्यंत अनेक पुरस्कारांवर नावं कोरलं आहे.