सोशल डिस्टन्सिंग पाळत कलाविश्व पुन्हा 'ऍक्शन'मध्ये येण्याच्या तयारीत

कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार होण्याची चिन्हं   

Updated: May 20, 2020, 06:28 PM IST
सोशल डिस्टन्सिंग पाळत कलाविश्व पुन्हा 'ऍक्शन'मध्ये येण्याच्या तयारीत title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत असला तरीही आता लॉकडाऊनच्या या काळातून टप्प्याटप्प्याने कसे बाहेर पडता येईल याचाच विचार सर्व स्तरांमधून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते, कलाकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे निर्माते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. 

सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करत मर्यादित प्रमाणात चित्रपट, मालिका, कार्यक्रमांचे चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी बुधवारी त्यांनी संवाद साधला. 

सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. तर  खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री,  हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे यांची यादरम्यान उपस्थिती होती. या मंडळींनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत कलाविश्वाच्या कार्यपद्धतीविषयी काही महत्त्वाच्या सूचना करत आपल्या समस्याही मांडल्या.

मर्यादित प्रमाणात चित्रिकरणाचा विचार.....  

यावेळी अनेक निर्मात्यांनी चित्रीकरण आणि पोस्ट प्रॉडक्शन सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यावर ग्रीन किंवा ऑरेंज झोन मध्ये आपल्याला दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना कसे चित्रीकरण सुरु करता येईल याचा विचार करता येईल पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना, शिवाय चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टींचीही दखल घ्यावी लागणार असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला. 

संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडीओमध्ये परवानगी द्यायची झाल्यास तेथील जागा, वातानुकुलित यंत्राबाबतही सुचना द्याव्या लागतील, असं सांगत पावसाळयापूर्वी काही चित्रीकरणे शक्य होतील का याचाही आढावा घेण्यास या चर्चेदरम्यान सांगण्यात आलं.  ते पाहण्यास त्यांनी सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांना सांगितले. 

शॉल्लेट! मुंबई पोलिसांना निवेदिता- अशोक सराफ यांचा गोड सलाम

कलाविश्वातील काही मागण्या.... 

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असतेवेधी नितीन वैद्य यांनी माहिती दिली की, ७० हिंदी, ४० मराठी आणि १० ओटीटी अशा ११० मालिकांची चित्रीकरणे कोरोनामुळे थांबली आहेत. परिणामी जवळपास ३ लाख कामगार आणि तंत्रज्ञ यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दरवर्षी ३० हजार एपिसोड तयार होतात. या विश्वात २५० कोटींपासून ते ५ हजार कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक गुंतवणूक आहे. ज्या धर्तीवर निर्मात्यांना विना तारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटाना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मिती जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव आणि इतर प्रसंग पाहता सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अनिवार्य करत आणि असे अनेक नियम पाळत कार्यक्रमांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळावी परिणामी कलाविश्वाचं नुसकान काही अंशी भरुन निघेस असा सूरही क़ॉन्फरन्सदरम्यान काही मंडळींनी आळवला. 

 

दरम्यान, मनोरंजन हे फक्त करमणूक करणारे क्षेत्र नाही तर अनेकांकडून त्याचे अनुकरण करण्यात येतं, बऱ्याच गोष्टींबाबतची शिकवण घेतली जाते, वास्तवातील जीवनाशी हे क्षेत्र जोडले गेले आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सोबतच नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने अशा ठिकाणी लगेचच परवानगी देता येईल हे चित्र मात्र धुसर असल्याची वस्तुस्थिती त्यांनी सर्वांपुढे ठेवली.