मुंबई : कलाविश्वात आपल्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते जॉनी लीवर आज ६२वा वाढदिवस साजरा करत आहे. जॉनी लीवर यांचं लहानपण अतिशय हालाकीत गेलं. त्यांची परिस्थिती इतरी खराब होती, की शाळेची फी भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे शाळेतूनही त्यांना काढण्यात आलं होतं. या काळात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. जॉनी लीवर यांचं खरं नाव जॉन प्रकाश राव जानूमला. पण हिंदुस्तान लीवरमध्ये काम केल्यामुळे त्यांना जॉनी लीवर हेच नाव पडलं.
१९९९ मध्ये जॉनी लीवर यांच्याकडून एका खासगी कार्यक्रमात तिरंग्याचा अपमान झाला. तिरंग्याचा अपमान केल्यामुळे त्यांना सात दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर जॉनी लीवर यांनी याबाबत माफी मागितली. या माफीनंतर त्यांची शिक्षा कमी करत ती एक दिवस करण्यात आली होती.
जॉनी लीवर यांनी, मी रोमन कॅथलिक आहे आणि मी नेहमीच अध्यात्मावर विश्वास ठेवणारा असल्याचं सांगितलं. पण एका घटनेने माझ्यात मोठा बदल केला. माझ्या मुलाला थ्रोट ट्यूमर होता. त्यावेळी संपूर्ण वेळ मी प्रार्थनेत व्यतित करायचो.
काहा दिवसांनी मी मुलाला पुन्हा चाचणी करण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन गेलो. त्यावेळी डॉक्टरने मुलाचा ट्युमर गेला असल्याचं सांगितलं. त्याच दिवसांपासून माझ्या मनात देवाविषयी अधिक विश्वास दृढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्यावेळी जॉनी लीवर यांच्या मुलाला कॅन्सर झाला होता, त्यावेळी तणावाच्या या परिस्थितीत त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणंही सोडलं होतं.