'महिलाच खऱ्या अर्थाने दलित आणि उपेक्षित आहेत; कारण.... '

नागराज मंजुळेंचं लक्षवेधी वक्तव्य 

Updated: Mar 2, 2020, 03:47 PM IST
'महिलाच खऱ्या अर्थाने दलित आणि उपेक्षित आहेत; कारण.... ' title=
नागराज मंजुळे

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : फक्त कलाविश्वापुरतंच सीमीत न राहता समाजातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुन्हा एकदा एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. मंजुळे यांनी वारंवार शोषणाला सामोरं जावं लागणाऱ्या महिलाच दलित आणि उपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. 

'ज्याचं शोषण होत ते दलित असतात आणि जगातील अर्धी लोकसंख्या असणाऱ्या महिलाच खऱ्या अर्थाने दलित आणि उपेक्षित आहेत, कारण अजून ही त्यांचं शोषण होत आहे', अस मत नागराज मंजुळे यांनी मांडलं. लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरही मंजुळे यांनी दृष्टीक्षेप टाकला. ज्याआधारे त्यांच्या लावणीतील 'मैना' ही या पूर्वीच चित्रपटात येणं गरजेचं होते, पण तस झालं नाही कारण माध्यमं ही संकुचित विषयातच रेंगाळत होती, अशी खंतही मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यातील वाटेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या ३१व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा अध्यक्षस्थानावरून त्यांनी हे मुद्दे समोर ठेवले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जनमशताब्दीनिमित्त त्यांच्या जन्मगावी हे साहित्य संमेलन आयोजित कण्यात आलं होतं.

हिंसा फक्त शाररिक इजा करूनच होत नाही, तर एखाद्याला जातीच्या नावाने हिणवणे ही सुद्धा एक मोठी हिंसा आहे, गावागावातील जातीचे वाडे ही हिंसक व्यवस्थाही बदलावी लागेल, अस आग्रही सूर मंजुळेंनी आळवला. 

नागराज मंजुळे यांचे हे विचार आणि त्यांनी अधोरेखित केलेले अतीव महत्त्वाचे मुद्दे पाहता आता त्यावर येत्या काळात काही पावलं उचलली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान चित्रपट वर्तुळात आपल्या दिग्दर्शन शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नागराज मंजुळे आता येत्या काळात 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटातून बिग बी अमिताभ बच्चन झळकणार आहेत.