'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित "बापजन्म" या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला. कसलेला अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिन खेडेकर आपल्याला या सिनेमात एका नव्या ढंगात दिसणार आहेत.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 11, 2017, 01:27 PM IST
'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच  title=

मुंबई : निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित "बापजन्म" या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला. कसलेला अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिन खेडेकर आपल्याला या सिनेमात एका नव्या ढंगात दिसणार आहेत.

'बापजन्म' या सिनेमाच्या नावावरूनच सिनेमाची उत्कंठा वाढते. एका बापाचं एक रूटिन या टिझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. आपला दिनक्रम तो बाप एका डायरीमध्ये लिहून ठेवतो. या टिझरमध्ये आपल्याला सचिन खेडेकर आणि दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला 'आशू' म्हणजे पुष्कराज चिरपुटकर दिसत आहे. त्याचप्रमाणे हे टिझर शेअर करताना असं म्हटलं आहे की, बाबांच्या डायरीचं एक पान जिवंत झालंय! तुम्हीपण ते जगून पहा! यामुळे सिनेमाची उत्कंठा वाढत आहे. आजच सचिन खेडेकर यांचा 'कच्चा लिंबू' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचं मन जिंकण्यात हा सिनेमा खरा उतरेल यात शंका नाही. त्यामुळे या पाठोपाठ आता 'बापजन्म'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी केली आहे. युवा आणि प्रतिभाशाली निपुण धर्माधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा १५ सप्टेंबर २०१७ला प्रदर्शित होत आहे.
‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची आहे. 

निपुण धर्माधिकारी हे नाव आज घराघरात पोहोचलेले नाव आहे आणि त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याने २००९मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनर्रुजीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले.

भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुणची ख्याती आहेच, पण त्याचबरोबर त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने आणि लेखनाने आपला ठसा उमटवला आहे. त्यात ‘नौटंकी साला’ (२०१३) आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) या चित्रपटांचा समावेश आहे. निपुणचे दिग्दर्शन असलेल्या ‘बापजन्म’ या आगामी चित्रपटाने रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.